चालकाचे अपहरण करून कार पळवली, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:08 AM2017-11-02T01:08:39+5:302017-11-02T01:08:44+5:30
चाकूच्या धाकावर चालकाचे अपहरण करून कार चोरल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. हातपाय बांधलेल्या अवस्थेत आरोपींनी चालकास पुण्याजवळ कारबाहेर ढकलले होते.
ठाणे : चाकूच्या धाकावर चालकाचे अपहरण करून कार चोरल्याची घटना सोमवारी ठाण्यात घडली. हातपाय बांधलेल्या अवस्थेत आरोपींनी चालकास पुण्याजवळ कारबाहेर ढकलले होते.
ठाण्यातील मानपाड्यात राहणारे ३१ वर्षीय मुरूगन वेदमुत्तू नाडार हे बदली चालक म्हणून गत १० दिवसांपासून वृंदावन सोसायटी येथील सुरेश सुब्रमणीयम यांच्याकडे कामाला होते. ३० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास काम आटोपून घरी जात असताना मालकाची पत्नी चित्रा यांनी फोन करून त्यांना डॉक्टरकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, चालकाने पुन्हा घरी जाऊन चित्रा यांना रात्री ९ वाजताच्या सुमारास कारने हिरानंदानी मिडोस येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे नेले. चित्रा क्लिनिकमध्ये गेल्या असताना चालक कारमध्ये मोबाइलवर चॅटिंग करत होते. त्याच वेळी २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन युवक कारमध्ये घुसले आणि त्यांनी चालकाला मागच्या सीटवर ओढले. गळ्याला चाकू लावून आरडाओरड न करण्याची धमकी दिली. आरोपींनी चालकाच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. दोन्ही हात आणि पायही बांधले. वाटेत एका पेट्रोलपंपावर आरोपींनी कारमध्ये इंधन भरले. काही तासांनी पुण्यातील आळेफाटा येथे आरोपींनी चालकास कारमधून ढकलून दिले. आरोपी कार घेऊन पळून गेल्यानंतर चालकाने हात सोडवण्यासाठी एका मोटारसायकलस्वाराची मदत घेतली. या मोटारसायकलस्वाराने चालकास आळेफाटा पोलीस ठाण्यात सोडले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर चालक एका टेम्पोने ठाण्यात पोहोचला. आरोपींनी आपला मोबाइल फोन आणि ३०० रुपये रोख घेतले असल्याचे चालकाने तक्रारीत म्हटले आहे. चितळसर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी रात्री तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हिरानंदानी मिडोसमधील सीसी कॅमेºयाचे फूटेज पोलिसांनी तपासले. मात्र, त्यातून काही स्पष्ट होत नसल्याचे चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी सांगितले.
आरोपींचे संभाषण संशयास्पद
ठाणे ते पुणेदरम्यानच्या प्रवासादरम्यान आरोपींचे आपसातील संभाषण चालकाने ऐकले. त्यानुसार, आरोपींनी एकाला मारले असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याचे चालकास समजले. चालकाने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असून, त्या दिशेनेही तपास सुरू आहे.