काँक्रिटीकरणाचा चालकांना फटका, खड्डे, धुळीतून काढावी लागते वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 01:16 AM2018-12-08T01:16:07+5:302018-12-08T01:16:15+5:30
ठाकुर्ली पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहनांची वर्दळ वाढली असताना पश्चिमेला बावनचाळीत पुलानजीक असलेल्या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे.
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहनांची वर्दळ वाढली असताना पश्चिमेला बावनचाळीत पुलानजीक असलेल्या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. त्यातील एका रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असताना दुस-या रस्त्याचे काम सुरू केले आहे. या ढिसाळ नियोजनामुळे खड्डे आणि धुळीच्या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने न्यावी लागत आहेत. त्यामुळे त्यांची कसरत होत आहे.
ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर २०१६ मध्ये सुरू करण्यात आले. पूर्वेला स. वा. जोशी हायस्कूलकडे उतरणा-या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला करण्यात आला. तर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या बाजूकडील पुलाचा दुसरा टप्पा अद्याप पूर्ण व्हायचा आहे.
उड्डाणपुलामुळे पश्चिमेतील परिसराच्या विकासाला चालना मिळाली. तेथील खड्डेमय रस्ते सुस्थितीत येण्यास सुरुवात झाली. प्रारंभी या परिसरातील रस्त्यांना डांबरीकरणाचा साज चढवला होता. पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा त्रास कायम राहिला. त्यामुळे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सध्या सुरू केली आहेत. परंतु, योग्य प्रकारे नियोजन नसल्याने या कामांचा वाहनचालकांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे पुलावरून उतरल्यावर बावनचाळ, राजू नगर, गणेश नगर, नवापाडा आणि चिंचोड्याचा पाडा येथे जाणाºया आणि तेथून पुलाकडे येणाºया वाहनचालकांना व पादचाºयांना चिंचोळ्या अशा खड्डेमय तसेच धुळीच्या रस्त्यांवरून वाट काढावी लागत आहे.
>रस्ता अर्धवट स्थितीत बंद केल्याने संभ्रम
पुलाच्या परिसरातील दोन रस्त्यांपैकी एका रस्त्याचे काम पूर्णत्वाला आले आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून अन्य रस्त्यांचे काम हाती घेणे आवश्यक होते. पुलाजवळील उजवीकडे जाणारा रस्ताही पुढच्या बाजूस खोदायला घेतल्याने सध्या तो वाहतुकीसाठी बंद आहे. त्याची सूचनाही लावली आहे. पण तो रस्ता अर्धवट स्थितीत बंद केल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. पुढे जाऊन पुन्हा माघारी वाहन वळवावे लागत आहे.