वाहनचालकांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:39+5:302021-05-24T04:38:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बहुतांश खासगी क्षेत्रांना फटका बसला असताना यातून खासगी वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय करणारेही ...

Driver's income decreased | वाहनचालकांचे उत्पन्न घटले

वाहनचालकांचे उत्पन्न घटले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बहुतांश खासगी क्षेत्रांना फटका बसला असताना यातून खासगी वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय करणारेही सुटलेले नाहीत. आसन क्षमतेच्या मर्यादा आल्याने त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यात वाहनांसाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फेडायचे तरी कसे, असा यक्षप्रश्न त्यांना पडला आहे. दुसरीकडे वाहन दुरुस्तीची गॅरेज चालू ठेवण्यावरही बंधने आल्याने गॅरेज चालकांचाही रोजगार बुडाला आहे. सद्य:स्थितीला लागू असलेल्या निर्बधांत वाहनचालकांचे उत्पन्न घटल्याने ग्राहकांकडून बिले थकविण्याच्या समस्येलाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कल्याण डोंबिवलीत १० मार्चपासून केडीएमसीकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एप्रिल महिन्यांपासून कडक अंमलबजावणी सुरू झाली. यात मेडिकल दुकाने वगळता अन्य अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. अन्य दुकानदारांना मात्र कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. यात गॅरेज व्यावसायिकांचाही समावेश आहे. कल्याण डोंबिवलीत लाखोंच्या संख्येने वाहने आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता आसन क्षमतेच्या अटींवर खासगी वाहनांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहेत. अत्यावश्यक काम वगळता खासगी वाहनांना सकाळी ११ नंतर मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील वाहनांनादेखील दुरुस्तीकामी गॅरेजची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे गॅरेज चालू ठेवण्यात यावीत, अशी मागणी वाहनचालकांसह गॅरेजवाल्यांकडूनही होत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांच्या गरजेनुसार काही ठिकाणी चोरीछुपे बंद शटरआड गॅरेज चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.

----------------------------------------

वाहने सुरू, गॅरेज बंद

शहरात गरजेनुसार गॅरेजवाल्यांकडून वाहनचालकांना सेवा दिली जात असली तरी ग्रामीण भागातील वाढता कोरोना पाहता गॅरेज पूर्णपणे बंद आहेत. त्याचा फटका तेथील वाहनचालकांना बसत आहे. वाहनामध्ये बिघाड झाल्यास वाहनासह पायपीट करीत शहर गाठावे लागत आहे. त्यात वाहन दुरुस्तीसाठी लागणारे सामानही मिळत नसल्याने त्यांची चांगलीच परवड होत आहे. सामान न मिळणे हा अनुभव शहरातील वाहनचालकांनाही येत आहे. वाहन दुरुस्त होत नसल्याने दैनंदिन कामाचाही खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

------------------------------------------

वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

खबरदारी म्हणून बहुतांश नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे बरेच दिवस वाहन धूळ खात पडत असल्याने बॅटऱ्यांमध्ये बिघाड होऊन वाहन नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गॅरेज बंद असल्याने दुरुस्तीसाठी वाहन न्यायचे तरी कुठे, असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावात भाड्याने प्रवासी वाहन देण्याचा व्यवसायही ठप्प पडला आहे. आसन क्षमतेची मर्यादा आणि त्यात ई-पास बंधनकारक केल्याने प्रवासालाही बंधने आली आहेत. कर्जाच्या माध्यमातून वाहने खरेदी करून व्यवसाय करणाऱ्या वाहनचालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

--------------------------------------------

वाहने पार्किंगमध्येच

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च ते मे महिना पूर्णपणे व्यवसाय ठप्प होता. जूनपासून अनलॉक सुरू झाले; पण आसन क्षमतेची मर्यादा घालण्यात आली होती. त्याचा परिणाम वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यावर झाला. नोव्हेंबरमध्ये कोरोना आटोक्यात येतो असे चित्र होते. परंतु फेब्रुवारीपासून पुन्हा कहर मांडल्याने पुन्हा एकदा व्यवसाय करण्याला मर्यादा आल्या आहेत. यामुळे उपासमारीची वेळ ओढावली आहे.

- सागर सावंत, वाहनचालक-मालक, कल्याण

---------------------------------------------

सद्य:स्थितीला गॅरेज बंद असल्याने वाहन बाहेर काढतानाही विचार करावा लागतो. जर एखाद वेळेस टायर पंक्चर झाले अथवा गाडीत बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी न्यायचे तरी कुठे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे नाइलाजास्तव गाडी बंद ठेवावी लागत असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागत आहे.

- राकेश जाधव, वाहनचालक, डोंबिवली

-----------------------------------------------

गॅरेजवाल्यांचे पोटपाणी बंद

लॉकडाऊनमध्ये कामगार गावाला निघून गेल्याने कामगारांची वानवा आहेच. त्याचबरोबर राज्य सरकारनेही व्यवसाय चालू ठेवण्याबाबत स्पष्ट केलेले नाही. वाहने रस्त्यावर धावत असल्याने गॅरेजचीही आवश्यकता आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांचे रोजगारही बुडाल्याने वाहने दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांची थकबाकीही वाढली आहे.

- दिलीप वेदक, गॅरेजचालक, डोंबिवली

-------------------------------------------------

लॉकडाऊनमुळे दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. खासगी वाहने रस्त्यावर धावत आहेत. त्यात सरकारी अत्यावश्यक सेवेतील वाहनांनादेखील गॅरेजची आवश्यकता असल्याने सरकारने गॅरेज चालू करण्यास मुभा द्यावी.

- महेश ताजणे, गॅरेजचालक, कल्याण

---------------------------------------------------

वाहनांची संख्या डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ कालावधीत १६ हजार ८८९ वाहनांची नोंद

दुचाकी १३,७८७, कार २,६०८, रिक्षा ४००, ट्रक ८५, रुग्णवाहिका ९

Web Title: Driver's income decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.