रांजनोली नाक्यावरील ‘वसुली’ने वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 12:07 AM2020-12-18T00:07:00+5:302020-12-18T00:07:09+5:30
भिवंडीतील वाहतूककोंडीकडे दुर्लक्ष
- नितीन पंडित
भिवंडी : शहरातील वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली असताना वाहन चौकशीच्या नावाने ‘वसुली’ करण्याची मोहीम वाहतूक पोलीस विभागाकडून भिवंडी बायपास येथील रांजनोली नाक्यावर सुरू असल्याचा आरोप वाहनचालक, मालक करीत आहेत. चौकशीच्या निमित्ताने वाहने अडवून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास चक्क दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैशांची मागणी वाहतूक पोलिसांकडून केली जात असल्याची वाहन चालकांची तक्रार आहे.
कोरोना संकटानंतर हळूहळू वाहन चालक आपल्या दीर्घकाळ घराखाली उभ्या ठेवलेल्या मोटारी रस्त्यावर आणत आहेत. अनेकांना आपल्या गाडीची पीयूसी व इंशुरन्स काढता आला नसल्याने अशा वाहन चालकांकडून येथे २ हजार ४०० रुपयांची पावती फाडण्याची भीती दाखवून बेकायदा वसुली केली जात असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
कल्याण नाका ते भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापर्यंत नेहमीच वाहतूककोंडी होत असते. पोलीस अधिकाऱ्यांनादेखील या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो.
मात्र ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याचे सांगत कोंडी सोडविण्यासाठी ट्राफिक वॉर्डनची मदत घेतली जात असताना रांजणोली नाक्यावर पंधरा ते वीस वाहतूक पोलिसांचा जथ्था वाहन चौकशीसाठी नेहमी तैनात असतो.
एवढ्या मोठ्या संख्येने वाहतूक पोलीस एकाच ठिकाणी का जमा असतात, असा वाहन चालकांचा सवाल आहे. नागरिकांची या ‘वसुली’तून सुटका संबंधित अधिकारी करतील का, याकडे वाहन चालकांचे लक्ष लागले आहे.
वाहतूक नियमांचे पालन व्हावे व वाहतूक विभागाचा धाक राहावा यासाठी रुटीन चेकिंग करण्यात येते. मात्र जर पैसे वसुली होत असेल तर निश्चितच चौकशी करण्यात येईल.
- अशोक थोरात, पोलीस निरीक्षक
शहरात वाहतूककोंडीची समस्या गंभीर असताना वाहतूक पोलिसांकडून घडणारा हा प्रकार गंभीर असून यासंदर्भात वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलणार आहेत.
- योगेश चव्हाण, पोलीस उपायुक्त
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करू. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. - बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक विभाग
यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- रईस शेख, आमदार, भिवंडी पूर्व