कल्याण-डोंबिवलीत वाहन चालवताय, पण जरा सांभाळून !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:18 AM2019-12-09T00:18:34+5:302019-12-09T00:18:56+5:30

गेल्या काही महिन्यांतील अपघातांची आकडेवारी पाहता कल्याण-डोंबिवली शहरांत ११ महिन्यांत रस्ते अपघातांत एकूण २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे,

Driving in Kalyan-Dombivali, but with a little care! | कल्याण-डोंबिवलीत वाहन चालवताय, पण जरा सांभाळून !

कल्याण-डोंबिवलीत वाहन चालवताय, पण जरा सांभाळून !

Next

-प्रशांत माने

या आठवड्यात डोंबिवलीत घडलेल्या दोन रस्ते अपघातांच्या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. यात चार निष्पाप जीवांचा बळी गेला. परंतु, गेल्या काही महिन्यांतील अपघातांची आकडेवारी पाहता कल्याण-डोंबिवली शहरांत ११ महिन्यांत रस्ते अपघातांत एकूण २४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १४० जण जखमी झाले आहेत. यात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या ६८ च्या आसपास आहे. या रस्ते अपघातांची कारणे विविध असली, तरी ज्या रस्त्यांवरून वाहने चालविली जातात, ते रस्ते खऱ्या अर्थाने योग्य प्रकारचे आहेत का, याचाही आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. दोन्ही शहरांतील बहुतांश रस्त्यांची एकंदरीतच स्थिती पाहता वाहन चालवताय, पण सांभाळून, असे म्हणणे उचित ठरणारे आहे.

केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ५३२ किलोमीटर आहे. ५३२ पैकी ३८२ किलोमीटरचे रस्ते हे कल्याण-डोंबिवली शहरांतील आहेत, तर उर्वरित १५० किलोमीटरचे रस्ते २७ गावांतील आहेत. महापालिका हद्दीतील ३२ किलोमीटर रस्त्यांचेच काँक्रिटीकरण झाले आहे. उर्वरित ५०० किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. यातील काही रस्त्यांचे आता काँक्रिटीकरण करायला सुरुवात झाली असून जी कामे याआधी पार पडली आहेत, त्यातील काही कामे सुमार दर्जाची झाली आहेत, यात शंका नाही.

काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांची पातळी समान न राहिल्याने हे चढउतारही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून, जागोजागी टाकलेले पेव्हरब्लॉक उखडले गेले आहेत. त्यांची जागा खड्ड्यांनी घेतल्याने काँक्रिटच्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे वाहनचालकांना जिकिरीचे होऊन बसले आहे. कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोड असो अथवा पश्चिमेकडील महंमद अली चौक ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता असो तसेच डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळीतील रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारितील हे रस्ते याचे उदाहरण आहे. दुसरीकडे पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याची कामे हिवाळा सुरू झाला तरी सुरू आहेत. त्यामुळे आजमितीला बहुतांश रस्ते खड्ड्यांत असून उडणाºया धुळीच्या त्रासाने पादचारी आणि वाहनचालक पुरते हैराण झाले आहेत.

केडीएमसीबरोबरच अन्य प्राधिकरणांकडून विकासकामे आणि प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या खोदकामांनी रस्त्यांच्या दुर्दशेला हातभार लावला आहे. केडीएमसी परिक्षेत्रातील रस्त्यांची स्थिती बिकट असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांचीही परिस्थिती दयनीय आहे. आता त्यांच्या अखत्यारितील डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा मार्गावर तीन जणांचा बळी गेल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने लागलीच अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम सुरू केले आहे. मार्चपर्यंत येथील काँक्रिटीकरणाचे काम मार्गी लागेल, असा त्यांचा दावा आहे.

गेल्या ११ महिन्यांतील अपघातांच्या घटनांचा विस्तृत आढावा घेता कल्याणमध्ये सात जण मृत्युमुखी पडले असून, २८ जण गंभीर तर ३३ जण किरकोळ जखमी आहेत. कोळसेवाडी विभागात १५ जण मृत्युमुखी पडले असून ३९ जण गंभीर जखमी व ३१ जण किरकोळ जखमी आहेत. डोंबिवलीत दोन जण रस्ते अपघातांत दगावले असून एक गंभीर जखमी, तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

वाहतूकव्यवस्थेचा अभाव आणि असलेल्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. यात वाहनांची वाढलेली संख्या लक्षात घेता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षित रस्त्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. परंतु, नेमके या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. रस्तेबांधणीसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, यांचे पालन होते का, या तत्त्वानुसार रस्ते बांधकामाच्या निविदा निघतात का? काम सुरू असताना कामाचा दर्जा, गुणवत्ता राखली जाते का? हा देखील संशोधनाचा विषय आहे.

कामाच्या गुणवत्तेवर शंका घेणाºया अनेक तक्रारी केडीएमसी प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यासंदर्भात आजवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. डांबर टाकल्यावर काही दिवसांतच त्याच्यावरील माती निघून खड्डेमय स्थिती पुन्हा निर्माण होत आहे. दर्जाहीन कामाच्या तक्रारीनंतरही काही ठरावीकच कंत्राटदारांना पुन:पुन्हा कामे दिली जात आहेत. यात रस्त्याखालील असलेल्या वाहिन्यांचाही विचार केला जात नाही. परिणामी, रस्ता बनल्यावर खोदकामांचा सिलसिला पुढे कायमच पाहायला मिळतो.

नवीन बांधकामांना परवानगी देताना रस्ते आणि गटारे यांचाही विचार केला जातो, परंतु हा नियमही बासनात गुंडाळला जातो. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे, वाहनांचे ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, गतिरोधकांचे प्रमाण कसे असावे, याचेही काही नियम आहेत. परंतु, नियम हे पायदळी तुडविण्यासाठीच असतात, याची प्रचीती येथील रस्ते पाहिल्यावर येते. पण, आता वाढत असलेल्या अपघातांचे प्रमाण आणि त्यात जाणारे नाहक बळी पाहता या सर्व बाबींचा विचार करण्याची वेळ आली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची स्थिती तातडीने सुधारण्यासाठी पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा, ‘इथे मरणही झाले स्वस्त’ असे म्हणण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही, हे देखील तितकेच खरे.

गेल्या वषी प्रशांत माने, कल्यार्ण पावसाळ्यात खड्ड्यांमुळे केडीएमसीच्या हद्दीत चार जणांचा बळी गेला होता. यंदा एकाचा बळी गेला असला तरी नुकत्याच डोंबिवलीत घडलेल्या दोन अपघातांच्या दुर्दैवी घटना पाहता रस्ते सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. वाहतूक नियम न पाळणे, अतिवेगाने वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहने चालवणे, ही मुख्य कारणे अपघात होण्यामागे आढळतात. प्रामुख्याने अपघात हे मानवी चुकांमुळे होत असतात, असे म्हटले जात असले, तरी या अपघातांना निकृष्ट दर्जाचे रस्तेदेखील तितकेच कारणीभूत असतात. चुकीची रस्तेबांधणी, खराब व खड्डेमय रस्त्यांमुळेही अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Web Title: Driving in Kalyan-Dombivali, but with a little care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.