जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बारवीत ९१.८७ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:27 AM2021-09-02T05:27:22+5:302021-09-02T05:27:22+5:30
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. यात जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना ...
ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. यात जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसून धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने बारवी धरणात ९१.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.
जिल्ह्यातील शहरांसह गावखेड्यातही पावसाची मंगळवारी रिपरिप सुरू होती. ठाण्यात वाहतूककोंडी मात्र नेहमीप्रमाणे होती. टीएमटी बस रस्त्यावर बंद पडल्याची घटना वागळे इस्टेटला घडली. घोडबंदरलाही वाहतूक कोंडी होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस उत्तमरित्या बरसला. भातसात ६३ मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे ९१.५५ टक्के पाणी साठा झाला. या धरणातून १.५०३ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. आंध्रा धरण परिसरात मात्र पाऊस पडला नाही. या धरणात ६७.५६ टक्के साठा आहे.
* बारवी भरण्यास विलंब
जिल्ह्यातील सर्व महानगरांसह एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी या धरणात १०० टक्के साठा होता. पण यंदा तो ९१.८७ टक्के आहे. बारवी धरणात अवघा १८९७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. मंगळवारी २८ मिलीमीटर पाऊस धरणात पडला. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रापैकी ३० मिलीमीटर खानिवरे या पाणलोटात, कान्होळला मिमी ३४ मिलीमीटर, पाटगांवला १९ मिलीमीटर आणि ठाकूरवाडी येथे ४७ मिलीमीटर पाऊस पडला.
--------