जिल्ह्यात पावसाची रिपरिप; झाडे कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 01:00 AM2020-08-12T01:00:19+5:302020-08-12T01:00:22+5:30
घोडबंदर रोडवर भाजीपाल्याचा ट्रक उलटला
ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ बंगळुरूहून गुजरातकडे जाणारा भाजीपाल्याने भरलेला ट्रक मध्यरात्री २.३० च्या सुमारास उलटला. यातील चालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.
ट्रक दुर्घटनेतील चालक मोहम्मद वारिस (३०) याच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. सहप्रवासी जाकीर हुसेन (४८) याच्या डोक्याला, इम्तियाज गफूर (२३) आणि मोहम्मद युसूफ अली (४५) या दोघांच्या हातापायाला किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. मानपाडा चितळसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलजवळ एक झाड पडून पाच कारचे नुकसान झाले. या ठिकाणी किरकोळ आगीची घटनाही घडली. मुंब्रा येथील शंकर मंदिराजवळ एक झाड आणि नौपाड्यातील एक झाड धोकादायक स्थितीत आहे.
बारवी धरणात २७ मिमी पाऊस
बारवी धरणात २४ तासांत २७ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटोळ या पाणलोट क्षेत्रातही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या या धरणाची पाणीपातळी ६५.८५ घनमीटर असून ५६.५९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ९८.९२ टक्के पाणीसाठा होता. आंध्र धरणात काही दिवसांच्या तुलनेत ३२ मिमी, भातसा ४४ मिमी, मोडक सागरमध्ये ६१, तानसात ४४ मिमी, तर मध्यवैतरणातही कमी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात श्रावण सरी कोसळल्या. दिवसभरात सरासरी २५.८ मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणे परिसरात २१, कल्याणला १७.९, मुरबाड ४७.८, भिवंडीला १२, शहापूरला ३५.५, उल्हासनगर २४ आणि अंबरनाथला २२ मिमी कमी पाऊस पडला आहे.