डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 06:48 AM2018-01-29T06:48:59+5:302018-01-29T06:49:13+5:30
केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही.
डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. दोन महिन्यांत पाणीप्रश्न न सुटल्यास पुढील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा नांदिवलीमधील ‘सर्वाेदय पार्क’ इमारतीमधील १८९ कुटुंबीयांनी घेतला आहे.
१ जून २००५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. तेव्हापासून पाणीप्रश्न सतावत आहे. ग्रामपंचायत असताना जेवढा पाणीपुरवठा होत होता, तेवढाही आता होत नाही. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने महिन्याला त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत.
पाणी मिळत नसताना महापालिकेकडून ४० ते ५० हजारांची पाणीबिले पाठवून जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील पाणीप्रश्नावर मंत्रालयदरबारी वारंवार बैठका झाल्या आहेत.
नांदिवली परिसरातील रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. तसेच महापौर आणि अन्य पदाधिकाºयांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने रहिवाशांनी याप्रकरणी डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवले होते. पत्रात समस्येची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष झाले आहे.
जलपुनर्भरणाचा नागरिकांना दिलासा
च्पाण्याचा कोटा वाढवण्याची केली जाणारी मागणी ही कार्यवाहीअभावी कागदावरच राहिली आहे. परिणामी, पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे नांदिवली येथील समर्थनगरमधील ‘सर्वाेदय पार्क’मधील रहिवासी पाणीटंचाईने पुरते हैराण झाले आहेत.
च्संकुलातील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.