उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात डबके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:56 PM2019-11-20T22:56:39+5:302019-11-20T22:56:42+5:30
रस्त्याचे काम अपूर्ण; नागरिकांना त्रास
उल्हासनगर : कॅम्प नं- २ रमाबाई आंबेडकरनगर येथील अर्धवट रस्त्यामुळे पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले आहे. डबक्यातून नागरिकांसह वाहनांना जावे लागत असून अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
रमाबाई आंबेडकरनगरमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले. मात्र संथ कामामुळे भररस्त्यात तळे साचले असून वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण करा असा आदेश बांधकाम विभागाचा असूनही संबंधित ठेकेदार, स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. रस्त्यावर खड्डे खणले असून पाणी साचून रस्त्यात डबके तयार झाले. शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पाय घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर जीव मुठीत धरून चालण्याची वेळ आलेली आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली. शहरात एकीकडे डांबरीकरण सुरू असून दुसरीकडे अनेक रस्त्यांची काम अर्धवट आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा बांधकाम विभागातील सावळागोंधळ उजेडात आला आहे. १८ कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या शहाड ते महापालिका रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट आहेत.