भांडारगृहात सडतायेत वाहने
By Admin | Published: February 25, 2017 03:08 AM2017-02-25T03:08:30+5:302017-02-25T03:08:30+5:30
भिवंडी महापालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडारगृहात काही वर्षापासून जुनी व नादुरूस्त वाहने सडत आहेत. यामध्ये एका अग्निशमन दलाच्या गाडीचा समावेश आहे
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या कोंबडपाडा येथील भांडारगृहात काही वर्षापासून जुनी व नादुरूस्त वाहने सडत आहेत. यामध्ये एका अग्निशमन दलाच्या गाडीचा समावेश आहे. त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महापालिकेकडे एकूण ९१ वाहने असून त्यापैकी भांडारगृहात असलेल्या वाहनांपैकी २९ वाहनांचा लिलाव काढण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. काही वर्षापासून भांडारगृहात सडत असलेल्या वाहनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या अपेक्षित रक्कमही मिळणार नाहीत. या वाहनांमध्ये जास्त डम्पर व अॅम्बेसिडर गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या वेळीच दुरूस्त करून त्या उपयोगात आल्या असत्या किंवा मुदतीत लिलाव केला असता तर त्याची विक्री रक्कम वाढली असती. परंतु याकडे दुर्लक्ष करत वाहन विभागाने पालिका पदाधिकाऱ्यांचे लाड पुरविण्यासाठी महागड्या गाड्या खरेदी करून आर्थिक संकटात ढकलले.
मनपावर कर्ज असल्याचे निदर्शनास आणून मुदतबाह्य पालिकेच्या टँकरव्दारा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. टँकर चालकाच्याशेजारी दरवाजा देखील नाही. याकडे नगरसेवक दुर्लक्ष करून काही पदाधिकारी दरमहा आवर्जून वाहनभत्ता घेत आहेत.
नवीन पदाधिकारी जुन्या गाडीत बसण्यास तयार नसतात.त्यामुळे दहा वर्षात नव्या गाड्या खरेदी
केल्या आहेत. दोन वर्षापूर्वी
सुस्थितीत असलेले डम्पर अचानक बंद झाल्याने कारवाईसाठी डम्पर नसल्याची माहिती प्रभाग अधिकारी देतात. बऱ्याचवेळा पालिका आयुक्त अॅम्बेसिडरमधून तर पदाधिकारी महागड्या गाडीतून फिरताना दिसतात. पालिका क्षेत्रात फिरण्यासाठी पालिका अधिकारी कमी किमतीची वाहने खरेदी करणे आवश्यक असताना जास्त किंमतीची वाहने खरेदी केली जातात,असा आरोप काही माजी नगरसेवकांनी केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे असेही या नगरसेवकांनी सांगितले.
भांडारगृहात उभ्या केलेल्या वाहनांचे टायरही गायब झाले असून भांडारगृहात अग्निशमन दलाची गाडीही बंद अवस्थेत उभी आहे. पूर्वी पालिकेच्या गाड्या कमी पडतात म्हणून भाड्याने विविध वाहने व पाण्याचे टँकर घेऊन पालिकेवर आर्थिक बोजा टाकलेला आहे. मागील दहा वर्षात वाहन विभागात झालेल्या गैरव्यवहाराची आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चौकशी करून भांडारगृहातील वाहनांचे सामान चोरीस कसे गेले?याचा तपास करावा आणि नंतरच वाहनांचा लिलाव करावा,अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)