बनावट प्रमाणपत्राद्वारे औषध विक्रीचा व्यवसाय: आणखी सहा फार्मासिस्ट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:16 PM2019-02-19T22:16:16+5:302019-02-19T22:21:36+5:30
ठाण्याच्या ढोकाळी येथील डॉ. पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्या मदतीने बनावट प्रमाणपत्र मिळवून विविध राज्यांमध्ये मेडीकल व्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भंडाफोड केला आहे. या प्रकरणात पूर्वी सहा जणांना अटक झाली होती. आता आणखी सहा जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे: बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मेडीकल व्यवसाय थाटणा-या टोळीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अलिकडेच पर्दाफाश केला. या प्रकरणातील नरेंद्र गेहलोत (३२), हरिशंकर जोशी(३८), दीपक विश्वकर्मा (३०), प्रेमचंद चौधरी (४०), प्रवीण गड्डा (५०) आणि महेंद्र भानुशाली (३०) या आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १२ झाली आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मेडीकल व्यवसाय चालविण्याच्या रॅकेटमधील सहा जणांना अटक केली होती. या सहा जणांना न्यायालयीन कोठडी मिळालेली असल्याने त्यांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाणे शहर औषध विक्रेता संघाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह युनिट एकच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले होते. या प्रकरणाचा सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सखोल तपास केला. फार्मास्युटिकलसह दहावी आणि बारावीची बनावट प्रमाणपत्रेही या टोळीकडून हस्तगत करण्यात आली आहेत. ठाण्याच्या ढोकाळी येथील डॉ. पुरुषोत्तम ताहिलरामानी यांच्या मदतीने आरोपी बनावट प्रमाणपत्रे मिळवायचे. विविध राज्यांमध्ये मेडीकल व्यवसाय चालविण्यासाठी टोळीकडून या बनावट प्रमाणपत्रांचा वापर करण्यात येत होता. गुन्हे अन्वेषण विभागाकडे आलेल्या एका तक्रारीच्या आधारे याआधी सहा जणांना अटक केल्यानंतर आता अटक केलेल्या नरेंद्र गेहलोत यांचे नवी मुंबईतील दीघा येथे श्रीरामदेव मेडिकल, तर हरिशंकर जोशी यांचे मुंब्रा येथे ‘लाइफकेअर फार्मा’ मेडीकल स्टोअर आहे. दीपक विश्वकर्मा याचे मुलुंडमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आहे. प्रेमचंद चौधरी यांचे भिवंडी, तर प्रवीण गड्डा याचे ठाण्यात रावमराठा मेडिकल अँड जनरल स्टोअर्स असून भानुशाली याचे डोंबिवली पूर्व भागात मेडीकल सुरु होते. गेहलोत याच्यासह सहाही जणांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.