नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 01:39 AM2018-10-13T01:39:20+5:302018-10-13T01:39:34+5:30
अंबरनाथमधील प्रकार : मुंब्रा येथील महिलांना केली अटक, यापूर्वीही त्यांच्यावर अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची झाली आहे नोंद
अंबरनाथ : अंबरनाथ पोलीस ठाण्याच्यावतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नशेबाज व्यक्ती नशेसाठी ज्या औषधांचा अतिरीक्त वापर करतात त्या औषधांचा साठा दोन महिलांच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. या औषधांची विक्री ही नशा करण्यासाठी केली जात होती. मुंब्रा येथील या महिलांना या आधीही अशाच प्रकारच्या नशेच्या औषध विक्री प्रकरणात अटक करण्यात आली होती.
या दोघी काही दिवसांपासून अंबरनाथच्या कैलाशनगर भागात राहण्यासाठी आल्या होत्या. त्यात रूख्साना शेख (४०) आणि सईदा शेख (५२) या महिला आरोपींचा समावेश आहे.या आरोपींनी अंबरनाथमध्ये घर घेऊन नशेसाठी वापरण्यात येणाºया औषधांची बेकायदा विक्री सुरू केली होती. त्यात नशा, गुंगीकारक औषध (बटन नावाने ओळखले जाणारे) अमली पदार्थांची विक्री केली जात होती.
अमली पदार्थ विक्रीच्या व्यवसायात या दोन्ही महिलांनी या आधीही अनेक गुन्हे केलेले आहेत. पुन्हा या महिलांनी तोच प्रकार अंबरनाथमध्ये सुरू केला होता. या नशेसाठी वापरल्या जाणाºया औषधांची माहिती पोलिसांना मिळताच उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या आदेशावरून एम.के.चौहान यांनी या महिलांच्या घरातून मोठा साठा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निशिगंधा पष्टे आणि डॉ. अनिल माणिकराव यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. या महिलांना रात्री अटक करण्यासाठी पोलिसांनी न्यायाधिशांची विशेष परवानगीही घेतली होती.
अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच अनेक तरूण या पदार्थांचे सेवन करून गुन्हे करत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई महत्वाची मानली जाते.
शहरात अशा प्रकारच्या अनैतिक गोष्टी घडत असल्याने येथील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी अशा गोष्टींना आळा घातल्याने नागरिकांनी अभिनंदन करत कठोर कारवाईची अपेक्षा केली आहे.