ठाण्यातील येऊरच्या जंगलात नशेबाज तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 08:16 PM2018-08-23T20:16:09+5:302018-08-23T20:22:28+5:30
वागळे इस्टेट येथील आपल्या घरातून २२ आॅगस्टपासून बेपत्ता असलेल्या शेहजाद अली शेख (१९, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या नशेबाज तरुणाने येऊरच्या मामा भाचे डोंगर परिसरात झाडाला आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
ठाणे : येऊरच्या मामाभाचे डोंगर परिसरातील एका नाल्याजवळील सागाच्या झाडाला शेहजाद अली शेख (१९, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) या नशेबाज तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.
शेहजाद २२ आॅगस्ट रोजी रात्री १० वा.च्या सुमारास घरी परतला होता. ‘बाहेर फिरून येतो’, असे सांगून तो रात्रीच घराबाहेर पडला होता. सकाळी अचानक त्याने गळफास घेतल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. आई, वडील, भाऊ, भावजय आणि दोन बहिणींसह वागळे इस्टेट येथे राहणाऱ्या शेहजादला व्हाइटनर या अमली पदार्थाचे सेवन करण्याचीही सवय होती. त्यामुळे तो नेहमीच नशेत असायचा. त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.