पावणेतेरा लाखांच्या गुंगीच्या औषधांसह चौकडीला ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:27 PM2018-09-25T21:27:53+5:302018-09-25T21:41:18+5:30
ट्रामाडोल या गुंगीकारक औषधांची विक्री करणा-या मयूर मेहतासह चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ठाणे : विक्रीसाठी बंदी असलेल्या ट्रामाडोल या गुंगीकारक औषधांची विक्री करणा-या मयूर मेहता(४६), रोमेल वाज (४९), संतोष पांडे (४१)आणि दीपक कोठारी (५२) या चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ट्रामाडोल हायड्रोक्लोराइडच्या १२ लाख ७४ हजारांच्या टॅबलेटस हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वेदनाशमक आणि गुंगीकारक असलेल्या ट्रामाडोल या औषधांची विक्री करण्यासाठी मुंबईतील मयूर मेहतासह चौघेजण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके आणि उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरातून मयूर मेहता याला आधी अटक केली. त्याच्याकडून १४० छोटया बॉक्समध्येवरील बंदी असलेली नऊ हजार ८०० स्ट्रीप्समधील औषधे तसेच पाचशे रुपये आणि मोबाईल असा १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही औषधे मोठया प्रमाणात गुंगीसाठी वापरण्यात येत असल्याने केंद्र शासनाने त्यांच्यावर बंदी आणली असून ती विक्री करणा-यांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात येते. दरम्यान, मेहता याने दिलेल्या माहितीच्या आधारे रोमेल, संतोष आणि दिपक या त्याच्या आणखी तीन साथीदारांनाही २५ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. यातील मेहता आणि रोमेल हे दोघे मुंबईतील रहिवाशी असून संतोष पालघर (मूळचा उत्तरप्रदेश ) आणि दीपक अहमदाबादचा रहिवाशी आहे. रोमेल आणि संतोष यांच्याकडून प्रत्येकी एक असे दोन तर दीपक याच्याकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून खंडणीविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या औषधांची मयूरने विक्रीसाठी आॅर्डर दिली होती, असेही तपासात उघड झाले आहे.
‘‘ ट्रामाडोल हे वेदनाशमक असून त्याच्या अतिरिक्त सेवनाने नशा येते. ब-याचदा त्याचा नशेसाठीही वापर केल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यावर केंद्र शासनाने बंदी आणली आहे.’’
संजय धनावडे, अध्यक्ष, औषध विक्रेता संघ, ठाणे शहर