ठाण्यात मद्यपी कामगाराची सार्वजनिक शौचालयातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:34 PM2020-05-25T23:34:21+5:302020-05-25T23:54:34+5:30
मित्रांकडून होणाऱ्या मारहाणीपासून वाचण्यासाठी चंचल लोहार या मद्यपी कामगाराने चक्क सार्वजनिक शौचालयाचा आधार घेतला. तो अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाने दरवाजा तोडून त्याची अखेर सोमवारी दुपारी सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मित्रांशी झालेल्या वादामुळे चंचल लोहार (२२, रा. काल्हेर, भिवंडी) या मद्यपी कामगाराने स्वत:ला बाळकूम येथील सार्वजनिक शौचालयात कोंडून घेतले होते. ही माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाने दरवाजा तोडून त्याची अखेर सोमवारी दुपारी सुटका केली.
बाळकूम पाडा क्रमांक दोन येथील ग्रेव यार्ड येथील परिसरात काही मित्रांशी चंचलचा २५ मे रोजी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. याच वादातून त्याला या मित्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यातून बचाव करण्यासाठी त्याने सार्वजनिक शौचालयाचा आसरा घेतला. दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या शौचालयात गेल्यानंतर त्याने आतून कडी लावून घेतली. बराच वेळ उलटूनही तो बाहेर न आल्याने अखेर स्थानिक रहिवाशांनी ठाणे आपत्ती व्यवस्थान विभागाला पाचारण केले. या विभागासह ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी शौचालयाचा दरवाजा तोडून त्याची सुखरुप सुटका केली. त्याला कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.