काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप
By सुरेश लोखंडे | Published: April 1, 2024 03:57 PM2024-04-01T15:57:18+5:302024-04-01T15:59:00+5:30
रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत.
ठाणे : येथील पूर्वेकडील चेंदणी कोळीवाडा बंदराच्या विसर्जन घाटाचा ठाणे महापालिकेने चेहरा मोहरा बदलला आहे. मात्र रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. त्यामुळे संध्याकाळी थाेडा अंधार पडतास स्त्री, पुरूषांना येथून येजा करताना भीती वाटत आहे. त्यात या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे ही चालूबंद हाेत असल्यामुळे रहिवाश्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील एक कोपरी विसर्जन घाट ओळखला जात आहे. पण पालिकेच्या दुर्लक्षितपणाचा गैफायदा घेऊन मद्यपी तळीराम संध्याकाळी थाेडा अंधार पडताच या घाटाचा ताबा घेऊन धुडगुस घालत आहेत. शनिवारी, रविवारीही याचा अनुभव परिसरातील रहिवाश्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांकडून महापालिकेच्या कारभाराविराेधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाणे पूर्वतील मिनी चौपाटी म्हणून विसर्जन घाटाच्या चेंदणी कोळीवाडा बंदराकडे पाहिले जात आहे. येथे वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. त्यांच्या कान्या काेपऱ्यात बसून मद्यपी रात्रभर पॅग रिचवत असल्याचे वास्तव रहिवाश्यांकडून ऐकायला मिळत आहे.
या परिसरातहज बंदरावर ठाणेकरांची पहाटेपासून सध्या वर्दळ वाढली आहे. खाडी किनारी सूर्योदयाची माेहक दृष्य बघायला मिळत आहे. येथील अँफी थिएटरमधील व्यायामाची कसरत आणि मनाला भुरळ पाडणाऱ्या गाण्यांच्या मैफील सकाळी सकाळी रंगत आहे. मात्र संध्याकाळनंतर या परिसरातील रात्र मद्यपी, गर्दुल्यांमध्ये वैऱ्याची ठरत आहे. पथदिवे पूर्ण क्षमतेने प्रकाश देत नसल्यामुळे त्याचा गैरफादा तळीराम, माद्यपी घेऊन धुडगूस घालत आहेत. या मद्यपीच्या रात्रभर पार्ट्या रंगत आहे. येथे सुरक्षा रक्षकाची खोली असून या ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पूर्ण क्षमतेने दिसून येत नाही. यास अनुसरून ठाणे महापालिकेशी संपर्क साधला असता, या परिसरातील सी सी टिव्ही आणि प्रकाश व्यवस्था तपासण्यात येईल.असे एका अधिकाऱ्यांने सांगून त्यावर अधीक बाेलणे टाळले.
ठाणे पूर्व मधील विसर्जन घाट सकाळी मनमोहक दिसत असला तरी, रात्रीच्या वेळी मनात भीती असते. परिसरात दिवे सर्वच पेटत नाहीत त्यामुळे अंधार वाटतो. अशातच एखाद्या कोपऱ्यात अंधाराचा गैफायदा घेऊन दारू पिणारी मंडळी दिसतात. त्यामुळे महिलांना एकटे दुकटे फिरताना भीती वाटते.
सुचित्रा भोईर (ठाणे पूर्व)