ओमी टीमची दुहेरी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:20 AM2019-10-16T01:20:55+5:302019-10-16T01:22:01+5:30

कल्याण पूर्वेत बोडारेंना साथ : उल्हासनगरात मनसे राष्ट्रवादीसोबत

The dual role of the Omi kalani team in ulhasnagar | ओमी टीमची दुहेरी भूमिका

ओमी टीमची दुहेरी भूमिका

googlenewsNext

सदानंद नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : पक्षाचा आदेश नसताना काही मनसे पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांना ओमी कलानी यांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला असून, ओमी कलानी यांनी मात्र कल्याण पूर्वेत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठिंबा दिल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे.


उल्हासनगर मतदारसंघातून भाजपने ऐनवेळेवर महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी नाकारल्याने कलानी कुटुंबाने नाराजी व्यक्त केली. अखेर, ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांच्या प्रचाराची धुरा मुलगा ओमी कलानी यांनी सांभाळली आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादीची सर्वत्र निवडणूक आघाडी असताना ओमी कलानी यांनी अंबरनाथ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांना पाठिंबा दिला असून, कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीचे प्रकाश तरे यांना बाजूला सारत शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना पाठिंबा जाहीर केला. ओमी कलानी यांच्या भूमिकेने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी व ओमी कलानी यांची ओमी टीम हे दोन्ही वेगवेगळे असून, त्यांचे निर्णयही स्वतंत्र असल्याचे या पार्श्वभूमीवर बोलले जात आहे.


महापालिका निवडणुकीदरम्यान ओमी टीमने राष्ट्रवादीतील नगरसेवक व बहुतांश पदाधिकाऱ्यांना सामावून घेतले. ओमी टीमने भाजपसोबत आघाडी करून महापालिकेची सत्ता मिळवली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही विधानसभेची उमेदवारी न दिल्याने, कलानी कुटुंबाने ज्योती कलानी यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात उतरवले. कलानी कुटुंबाला भाजपने झटका दिल्यानंतरही ओमी कलानी यांनी ओमी टीमचे अस्तित्व स्वतंत्र ठेवले. ज्योती कलानी व ओमी टीमची ताकद एकच असताना वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मनसेची पाठिंब्याची भूमिका अधिकृत नाही
मतदारसंघात मनसेचा उमेदवार नसल्याने भाजप-शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका मनसे पदाधिकाºयांनी घेतली आहे. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी याबाबत आपणास कल्पना नसल्याचे सांगून हात झटकले.


बोडारे यांना ओमी टीमचा पाठिंबा
ओमी टीमने कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीचे प्रकाश तरे हे उमेदवार असताना शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व ओमी कलानी यांच्यासह समर्थकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याबदल्यात बोडारे समर्थक ज्योती कलानी यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.


अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि ओमी एकत्र
अंबरनाथ : ओमी टीमने अंबरनाथ मतदारसंघात काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानी राष्ट्रवादीचे काम करत आहे, तर अंबरनाथ मतदारसंघातील काही भाग हा उल्हासनगर महापालिकेचा असल्याने तिथे अंबरनाथच्या काँग्रेस उमेदवारासोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंबरनाथ मतदारसंघात कॅम्प नंबर ४ व ५ मधील १९ प्रभाग येत असल्याने त्याठिकाणी टीम ओमीने वर्चस्व दाखवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांना टाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणातील केंद्र आता अंबरनाथ मतदारसंघाकडेही सरकल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: The dual role of the Omi kalani team in ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.