कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:57 AM2017-11-30T11:57:39+5:302017-11-30T12:15:17+5:30
उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.
डोंबिवली: उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.
वकील समीर तोंडापुरकर यांच्या मार्फत ती नोटीस हळबे यांनी आयुक्तांना बजावली असून महापालिकेने विनाविलंब नियंत्रण रेषा मारायला हव्यात, त्यामुळे फेरीवाल्यांना नेमके कुठे बसायचे ती जागा निश्चित होईल, तसेच त्या जागे व्यतिरीक्त जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर अशांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात हळबे यांनी मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये फेरीवाले पुन्हा स्थानक परिसरात आढळले असून ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला ठिकठिकाणचे प्रभाग अधिकारी, त्यांचे अतिक्रमण विभागातील कारवाई करणारे पथक आदी जबाबदार असल्याचे हळबे म्हणाले. त्यामुळे जर न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करायचा असेल तर अवमान याचिका का दाखल करण्यात येऊ नये असा सवाल त्यांनी आयुक्त पी.वेलरासू यांना केला आहे. तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाकाही स्मरणपत्र दिले आहे.
महापालिकेने न्यायालयाच्याच मार्गदर्शक तत्वांनूसार अद्याप कल्याण-डोंबिवलीत १५० मीटरपर्यंत नियंत्रण रेषा का मारल्या नाहीत, त्यात दिरंगाई का होत आहे असा सवालही त्यांनी केला. एकीकडे कारवाईपण नाही, आणि नियंत्रण रेषापण काढल्या जात नाहीत याबद्दल हळबेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
'' महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या नीर्देशांनूसार स्थानक परिसरात १५० मीटरवर नियंत्रण रेषा आखावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा असे पत्र आयुक्तांना आधीच दिले आहे. त्याची अंमलबजावणी होत नसेल तर सभागृहात त्यासंदर्भात आवाज उठवण्यात येईल.'' - राजेंद्र देवळेकर, महापौर