ब्लॉकमुळे ठाणे, दिवा, मुंब्रा येथील प्रवाशांचे झाले मेगा हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:08 AM2022-01-03T07:08:38+5:302022-01-03T07:08:51+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागांतील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी २ जानेवारी रोजी पहाटे २ ते ३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे रविवारी कामानिमित्त कल्याणकडे जाण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे मेगा हाल झाले. अनेकांना द्रविडी प्राणायाम करीत बस, रिक्षांचा आधार घ्यावा लागला. काही प्रवाशांना डोंबिवली आणि कल्याण येथून पुन्हा बस किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ठाणे ते दिवा विभागांतील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या महत्त्वपूर्ण कामासाठी २ जानेवारी रोजी पहाटे २ ते ३ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेपर्यंत २४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण या अप (मुंबईकडे जाणाऱ्या) तसेच डाऊन (कल्याणकडे जाणाऱ्या) मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवल्या होत्या. ज्या सुरू होत्या, त्या जलद मार्गावरून वळविण्यात आल्या होत्या. याच कालावधीमध्ये कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर लोकल थांबणार नसल्याचे रेल्वेने जाहीर केले होते. त्यामुळे ठाण्यातून कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांमध्ये उतरणाऱ्या प्रवाशांचे त्यातही लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
ज्या महिला ठाकुर्ली किंवा मुंब्रा येथून नातेवाईकांकडे शनिवारी किंवा शुक्रवारी आल्या होत्या, त्यांना परत लहान मुलांना रविवारी आपल्या स्थानकांकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.