नाला बुजवून बेकायदा बांधकामे , नागरिक भीतीच्या छायेखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:48 AM2018-05-30T00:48:19+5:302018-05-30T00:48:19+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत
धीरज परब
मीरा रोड : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोढ्याचा वेग कमी करण्यासाठी बांधलेले बांध वाहून गेले आहेत. तर खाली गावदेवी कंपाऊंड भागातून जाणाºया या नाल्याची भिंत कोसळू लागल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत. २००५ मध्ये येथील चाळ वाहून गेल्याने ९ जणांचा मृत्यू झाला होता. पालिका मात्र आजही सुमारे ३५ कुटुंबांना पावसाळ्याआधी घरे रिकामी करा म्हणून नोटीसच बजावते. वास्तविक नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा भराव करुन चाळी व नाले बांधलेले असूनही कारवाई करण्याऐवजी महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे संरक्षण मिळत आहे.
मीरा- भार्इंदर महापालिका हद्दीतील काशिमीरा महामार्गा जवळ महाजनवाडी परिसर आहे. पावसाळ्यात संरक्षित असलेल्या राष्ट्रीय उद्यानातील डोंगर - दºयांचे पाणी पूर्वी पासुनच नैसर्गिकरित्या काशिमीरा भागात वाहून येते. पाण्याचे हे प्रचंड लोंढे खूपच वेगाने खाली येतात. येताना ते दगड, झाडांचे ओंडके, माती आदी घेऊन येतात.
परंतु या नैसर्गिक ओढ्यांमध्ये व परिसरात महापालिका व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. सरकारी, आदिवासी जमिनींवर तर बेकायदा चाळी, गाळे बांधले गेले आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देतानाच पालिकेने सर्व सोयी सुविधा पुरवल्या आहेत.
येथील गुजराती चाळ, बापा सिताराम मंदिर परिसर, गावदेवी कंपाऊंड आदी बैठ्या वसाहतीही उद्यानातून येणाºया नैसर्गिक ओढ्याच्या परिसरात बेकायदा उभ्या राहिल्या आहेत जेणेकरून २००५ मध्ये आलेल्या जलप्रलयात पाण्याच्या लोंढ्यामध्ये अडसर ठरलेली एक चाळ वाहून गेली होती. चाळीसोबत आतील ११ रहिवाशीही वाहून गेले होते. त्यातील ९ जणांचा मृत्यू झाला होता.
इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतरही महापालिका व लोकप्रतिनिधींचे डोळे उघडले नाही. नैसर्गिक प्रवाहात अडथळा ठरणाºया बेकायदा बांधकामांवर कारवाईच केलेली नाही. महाविष्णू मंदिराजवळील नाल्याजवळच्या दामू नांबियार चाळीच्या तीन खोल्या पाण्याच्या प्रवाहाने पडल्या होत्या. शिवाय पालिकेने बांधलेल्या नाल्याचा भागही पूर्वी दोन वेळा पाण्याच्या प्रवाहाने कोसळला होता.
दरवर्षी पावसाळ्यात जंगलातून येणारा पाण्याचा प्रचंड वेगाने वाहणारा प्रवाह पाहून रहिवाशांच्या जीवाचा थरकाप उडतो. महापालिकेने यापूर्वी पावसाळ्याच्या आधी नाल्याजवळच्या ३५ खोल्यांना नोटीसा बजावल्या. पाण्याच्या प्रवाहामुळे जिवीतहानीचा धोका असल्याने घर रिकामी करा सांगण्याचे कागदी सोपस्कार उरकून पालिका हात वर करते. परंतु प्रत्यक्षात मात्र घरे कोणी रिकामी केली का? ते पाहिलं जात नाही.
तत्कालिन नगरसेविका मंदाकिनी गावंड यांच्या पाठपुराव्यानंतर विक्रमकुमार हे आयुक्त असताना वस्तीकडे येणारा पाण्याचा वेग कमी करण्यासाठी जंगलातील ओढ्यात पाच ठिकाणी बांध बांधले होते. परंतु प्रवाहाच्या प्रचंड वेगात तेही टिकले नाहीत. शिवाय गावंड यांनी या भागात काँक्रिटचे नाले बांधण्याची केलेली मागणीही अमृत अभियानाअंतर्गत पर्जन्य जलवाहिनी टप्पा क्र. २ मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र कामाचा थांगपत्ता नाही.