नाल्याच्या सफाईऐवजी नाल्यात मातीभराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 01:18 AM2019-05-29T01:18:12+5:302019-05-29T01:18:17+5:30
अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेने या नाल्यात मातीभराव करून भुयारी गटाराचे काम सुरू केले आहे. मुख्य नाल्यातच मातीभराव केल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अंबरनाथ पालिकेने शहरातील मुख्य आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. शिव मंदिर ते कानसई गावच्या स्मशानभूमीपर्यंतचा नाला साफ करण्याची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेवर आहे. मात्र, नाल्याच्या दुसऱ्या टोकावर उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदाराने नाल्यातच मातीभराव केल्याचे काही दिवसांपासून दिसते आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असतानाही या नाल्यातील गाळ काढण्याऐवजी त्या नाल्यात मातीभराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. त्यामुळे अंबरनाथ पालिका सर्वात आधी याच नाल्याची सफाई करते. यंदा काम करण्यासाठी गेलेल्या पालिकेला नाल्यातच मातीभराव दिसला.
मुळात दोन्ही शहरांच्या मध्यभागी हा नाला असल्याने नाल्याचे एक टोक पालिकेच्या हद्दीत, तर दुसरे टोक हे उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत आहे. या उल्हासनगर हद्दीतील नाल्याच्या शेजारी पालिकेने भुयारी गटार योजनेची वाहिनी टाकली आहे. ते काम संपुष्टातदेखील आले आहे. पावसाआधी नाल्यातील गाळ आणि माती काढणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची यंत्रणा ते काम करण्यास पुढाकार घेत नाही. दोन्ही शहरांच्या मध्यभागी नाला असूनही प्रत्येक पावसाच्या आधी अंबरनाथ पालिकाच हा नाला साफ करते. यंदा मात्र नाल्यातच मातीभराव केल्याने कसे काम करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ पालिका या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेत असताना उल्हासनगर महापालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज आहे.