वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्याने २३ बेवारस मृतदेहांकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:08 AM2018-10-21T06:08:38+5:302018-10-21T06:08:45+5:30
लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली.
ठाणे : लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केलेली ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा बंद पडल्याची बाब शनिवारी पुढे आली. यंत्रणा बंद पडल्याने रुग्णालय आणि आजूबाजूच्या असलेल्या नागरी वस्तीत दुर्गंधी पसरू नये, यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवण्यात येत आहेत. दुसरीकडे तिच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांकडून मृतदेह नेण्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती पूर्णपणे ठप्प पडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे. तसेच ती तत्काळ सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात १२ मृतदेह ठेवण्याची क्षमता आहे. त्यामध्ये दोन वातानुकूलित यंत्रणा बसवल्या आहेत. त्यातच दिवसाला पाच ते सहा मृतदेह शवागारात आणले जातात. मध्यंतरी येथील मृतदेहांची संख्या ४० ते ४५ च्या घरात पोहोचली होती. त्याचाच परिणाम येथील वातानुकूलित यंत्रणेवर झाल्याने तेथील एक यंत्रणा पूर्णपणे बंदच पडली होती. तिच्या दुुरुस्तीचे काम हाती घेतले होते. परंतु, ते करताना त्या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याने तसेच दुरुस्तीसाठी लोक आल्यावर शवागारात मृतदेहाची संख्या वाढल्याने त्या यंत्रणेचे काम मागे पडले आहे. याबाबत ठाणे शहर पोलीस आयुक्त असो किंवा ठाणे ग्रामीण तसेच पालघर पोलीस अधीक्षक असो, यांना पत्रव्यवहार करूनही त्यांच्याकडून मृतदेह ताब्यात घेतले गेलेले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी रात्री १९ आॅक्टोबरपर्यंत रुग्णालयाच्या शवागारातील मृतदेहांचा आकडा २८ वर गेला होता. या वाढत्या मृतदेहांचा आणि वाढत्या आकड्यांचा परिणाम यंत्रणेवर झाल्याने ती यंत्रणा चार दिवसांपासून बंद पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. बंद पडलेल्या यंत्रणेमुळे रुग्णालय प्रशासन या दिवसांत बर्फाच्या तीन ते चार लाद्या मागवून तेथे कुलिंग ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी पाच मृतदेह त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतल्याने सध्या २३ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत आहेत.
>शवागारातील यंत्रणा मागील तीन दिवसांपासून बंद पडली असून तेथे किडे पडले नाहीत. बेवारस असलेले मृतदेह नेण्याबाबत वारंवार पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहाराद्वारे कळवले आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. तो तसाच राहिल्यास येत्या एक-दोन दिवसांत महापालिकेच्या मदतीने त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागतील.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे