आचारसंहितेमुळे शहरातील तब्बल १२५ कोटींची विकासकामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:27 AM2019-03-12T00:27:53+5:302019-03-12T00:28:07+5:30
मीरा-भाईंदरमधील परिस्थिती : प्राप्त निविदांवर कार्यवाही नाही; अनेक कामे रखडणार
- राजू काळे
भाईंदर: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम रविवारी जाहीर झाला आणि लागलीच देशभरात आचारसंहिता लागू झाली. त्याचा परिणाम मीरा-भाईंदर शहरांतील विविध विकासकामांवर झाला असून यामुळे सुमारे १२५ कोटींची विकासकामे ठप्प होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामांच्या निविदा प्राप्त झाल्यानंतर याच आठवड्यात त्या उघडण्याची कार्यवाही होणार होती. मात्र, आता ही सगळी प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे.
मतदारांना प्रभावित करणारी कामे अथवा प्रलोभने दाखवणे हा आचारसंहितेचा भंग ठरतो. असाच प्रकार मीरा-भार्इंदर महापालिकेत घडला आहे. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी कित्येक कोटींच्या विकासकामांच्या निविदा आॅनलाइन प्रसिद्ध केल्या होत्या. याखेरीज, खासदार आणि आमदार निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यात एका गृहप्रकल्पासाठी तयार होणाऱ्या सुमारे दीड किमी काँक्रिट रस्त्याचाही समावेश आहे. त्यासाठी तब्बल ६० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पालिकेने काही दिवसांपूर्वी त्या रस्त्यासाठी जमीन संपादन तसेच त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली होती. शेवटी, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने त्या रस्त्याच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रियाच खोळंबली आहे. या रस्त्यासह भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन दरम्यानच्या फेज-२ मधील रस्त्याच्या बांधकामासह शहरातील उद्यान विकास आणि दुरुस्ती, पालिकेच्या मालमत्तांची दुरुस्ती, रस्तेदुरुस्ती अशी महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी काढलेल्या ७५ विकासकामांच्या आॅनलाइन निविदा पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. त्या निविदांच्या तांत्रिक कागदपत्रांसह दरपत्रक उघडण्याची कार्यवाही याच आठवड्यात पार पाडण्यात येणार होती. तत्पूर्वीच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सुमारे १२५ कोटींची विकासकामे ठप्प झाली आहेत. यातील तातडीच्या विकासकामांच्या प्राप्त निविदांना मंजुरी देण्यासाठी प्रशासन राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन भिवंडीत रखडले
भिवंडी : महानगरपालिकेच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन सोमवार, ११ मार्च रोजी करण्याचे ठरले होते. परंतु, लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारपासून आदर्श आचारसंहिता जाहीर केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी काही वर्षांपासून पुढे आली आहे. यानिमित्ताने पालिका महासभेत ठराव घेतला आहे. तरीही, मुख्य इमारतीच्या आवारात पुतळा उभारण्यासाठी कोणतीही कारवाई मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात नव्हती. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
मात्र, तेव्हा आचारसंहिता असेल म्हणून भूमिपूजनासाठी ११ मार्चचा दिवस निवडण्यात आला होता. परंतु, रविवार १० मार्चपासून निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केल्याने त्याचा फटका महानगरपलिकेला बसला आहे.