सहा हजार ट्रकच्या संपामुळे जिल्ह्यात मालवाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:28 AM2018-06-19T03:28:07+5:302018-06-19T03:28:07+5:30
देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : देशभरातील ट्रक मालवाहतूकदारांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. या संपाच्या कालावधीत ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सहा हजार ट्रकची वाहतूक बंद राहणार आहे. सोमवार संध्याकाळपासून काही मालकांनी ट्रक जागेवर उभे केल्याचे पूनम ट्रक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मालक सुनील भोंडिवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस असोसिएशन (एआयएमआयसी) व आॅल इंडिया कॉन्फडरेशन आॅफ गुड्स व्हेइकल्स ओनर असोसिएशन (एआयसीजीव्हीओ) या संघटनांच्या नेतृत्वाखाली मालवाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या मालकांनी संपात सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातीलसुमारे सहा हजार ट्रकमालकांचा सहभाग आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील अन्य साहित्य वाहतुकीच्या बंदीमुळे बाजारपेठेवर परिणाम होणार असल्याचा अंदाज भोंडिवले यांनी व्यक्त केला.
देशभरातील अन्य ठिकाणी गेलेल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना २० जूनपर्यंत ठिकठिकाणी उभे राहण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, आमच्या गाड्या संध्याकाळीच आहे, त्या जागी उभ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचे भोंडिवले यांनी स्पष्ट केले.
>जीवनावश्यक वस्तूंना वगळल्याने परिणाम नाही
जिल्ह्यात देशपातळीवर सुमारे दोन ट्रान्सपोर्ट असोसिएशन सक्रिय आहेत. त्यांच्याकडून ट्रकमालकांवर दबाव येण्याची शक्यता आहे. या संपातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्यांचा फारसा परिणाम होणार नाही. तरीदेखील या संपाच्या कालावधीतील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.
>आरटीओचे महामार्गांवरील वाहतुकीकडे लक्ष
यासंदर्भात आरटीओ अधिकारी जितेंद्र पाटील यांना विचारणा केली असता आज तरी काही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आमची यंत्रणा महामार्गांवरील वाहतुकीवर लक्ष ठेवून आहे. हा संप काही दिवस सतत सुरू राहिल्यास वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी पहिल्या दिवशी दिल्ली परिसरात ट्रक मालवाहतुकीवर परिणाम झालेला असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.