कॉलम खोदतांना ८ गाळे आले खाली, सुदैवाने जिवीतहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:56 PM2019-02-14T13:56:06+5:302019-02-14T13:57:37+5:30
गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असतांना बाजूला असलेले ८ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळ्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी नाल्यावरुन जाण्यासाठी स्लॅब बांधण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु होते. त्यासाठी कॉलम खोदाईचे काम सुरु असतांनाच बाजूलाच असलेल्या बंद अवस्थेतील ८ गाळ्यांचे कॉलमच खाली सरकल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास वसंत विहार येथे घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
ठाणे महापालिकेच्या वतीने रस्त्यात बाधीत झालेल्या गाळेधारकांचे वसंत विहार येथील ग्लॅडी अल्वारीस रोड जवळ पुनर्वसन केले होते. याठिकाणी गाळेधारकांनीच या ठिकाणी २२ गाळ्यांचे बांधकाम सुरु केले होते. हे काम अंतिम टप्यात येऊन तेथे दुकानदारांचे फलकही लावण्यासाठी फ्रेम तयार करण्यात आली होती. दरम्यान या गाळ्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने पालिकेने नाल्यावर स्लॅब टाकून त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करुन देण्याची हमी दिली होती. त्यानुसार येथे नाल्याच्या ठिकाणी खोदकाम करुन कॉलम टाकण्याचे काम सुरु होते. परंतु त्याचवेळेस २२ पैकी आठ गाळ्यांचे कॉलम खाली सरकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे गाळे सुरु नसल्याने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. परंतु गाळ्यांचे जे काम करण्यात आले होते, ते अतिशय कमकवूत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळेच ही घटना घडली असावी असा कयास पालिकेने लावला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले.