ठेकेदाराच्या ‘शिवशाही’ने प्रवाशांची झोप उडाली, चालकांना पुरेशी विश्रांती नसल्याच्या तक्रारीमुळे भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:36 AM2018-01-23T02:36:49+5:302018-01-23T02:37:26+5:30
ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
ठाणे : ठाणे-कोल्हापूरदरम्यान धावणा-या ‘शिवशाही’ चालकांना पुरेशी विश्रांती मिळत नसल्याने १५ दिवसांपूर्वी या बसच्या चालकाने लोणावळा येथे बस बाजूला उभी करून चक्क झोप काढल्याचे धक्कादायक वृत्त आहे. एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांनी या वृत्ताचा इन्कार केला असला, तरी या पार्श्वभूमीवर पाच शिवशाही ठाणेकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. यापैकी तीन बस ठाणे ते बोरिवली मार्गावर सोमवारपासून धावण्यास प्रारंभ झाला.
हळूहळू या मार्गावर सर्व शिवशाही बस सोडण्यात येणार असल्याचे विभागीय नियंत्रक अविनाश पाटील यांनी सांगितले. ठाणे बस आगारासाठी १२ शिवशाही बस मंजूर झाल्या आहेत. त्यातील दोन कोल्हापूरसाठी, तर तीन ठाणे ते बोरिवली या मार्गावर सोडण्यात येतील. घोडबंदरच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवशाही २० मिनिटांच्या अंतराने सोडल्या जातील. स्टेशनहून सुटणाºया या शिवशाहीसाठी ४८ रुपये भाडे असून जलद धावणाºया या बसमध्ये कंडक्टर नसेल, असे पाटील यांनी सांगितले. ठाणे- बोरिवली मार्गावरील सेमीलक्झरी काही दिवसांनी बंद होतील. त्यामुळे आणखी १० शिवशाहीची मागणी नोंदवण्यात आली आहे.
कोल्हापूरला जाणाºया चालकाने झोप काढल्याची रंगली चर्चा-
ठाणे ते कोल्हापूरदरम्यान धावणाºया शिवशाही बस या खाजगी मालकीच्या आहेत. एसटीने त्या भाड्याने घेऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. या बसवरील चालक ठेकेदार कंपनीचे आहेत. या खाजगी कंपन्यांच्या चालकांना सतत ड्युटी करावी लागत असल्यामुळे त्यांना झोप मिळत नसल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे १५ दिवसांपूर्वी एका चालकाने लोणावळा येथे बस रस्त्याच्या बाजूला लावून झोप काढली. त्यानंतर, तो कोल्हापूरकडे बस घेऊन गेल्याचे वृत्त आहे. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. काही लोक नाहक चुकीची माहिती पसरवत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा विभागीय नियंत्रक पाटील यांनी सांगितले.