कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:13 AM2021-03-08T00:13:35+5:302021-03-08T00:14:04+5:30

पुजारी, पोलिसांचा निर्णय

Due to the corona, the ancient Shiva temple will remain closed on Mahashivaratri | कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

कोरोनामुळे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला राहणार बंद

Next

अंबरनाथ : येथील प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला (दि. ११) भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिराचे परंपरागत पुजारी आणि पोलीस यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. अंबरनाथच्या इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीच्या दिवशी कोरोनामुळे देऊळ बंद करण्याची वेळ आली आहे.
अंबरनाथचं शिवमंदिर तब्बल ९६१ वर्षे जुने असून, शिलाहार राजा मम्बवाणी याने उभारलेले हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना समजलं जातं.

या मंदिराची युनेस्कोनेही नोंद घेतली असून, वर्ल्ड हेरिटेज वास्तूंच्या यादीत या मंदिराचा समावेश केला आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला ३ ते ४ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी रात्री १२ वाजता आरती करून मंदिर दर्शनासाठी खुले होते, त्यानंतर सलग २४ तास भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. शिवाय अंबरनाथ शहरात महाशिवरात्रीला मोठी जत्राही भरते. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये हे मंदिर बंद होते. मिशन बिगीन अगेननंतर ते पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराचे परंपरागत पुजारी असलेले जुन्या अंबरनाथ गावातील पाटील कुटुंबीय आणि शिवाजीनगर पोलीस यांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.  महाशिवरात्रीला मंदिरात फक्त पुजाऱ्यांना प्रवेश असेल. पुजाऱ्यांकडून सर्व धार्मिक विधी केले जातील. मात्र, कोरोनामुळे सर्वसामान्य भाविकांना यंदा प्रवेश नसेल, अशी माहिती मंदिराचे पुजारी रवि पाटील यांनी दिली. 

मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांकडून बंद केले जाणार असून, भाविकांनी मंदिराच्या परिसरात येऊ नये. हा सर्व बंदोबस्त महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीपासून लावण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर परिसरात येण्याचा प्रयत्न करू नये.
- विनायक नरळे, स. पोलीस आयुक्त

‘महाशिवरात्रीची यात्रा रद्द केली असली तरी अंबरनाथ पालिका प्रशासनामार्फत या ठिकाणी देखरेखीसाठी कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. भाविकांनी या ठिकाणी येऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य पालिका प्रशासन करेल.
    - डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

Web Title: Due to the corona, the ancient Shiva temple will remain closed on Mahashivaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.