कोरोनामुळे घरच्या घरीच गणेश विसर्जनाला ठाणेकरांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:55+5:302021-09-14T04:46:55+5:30
ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलाव, विसर्जन घाट, तसेच श्री गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात ...
ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने कृत्रिम तलाव, विसर्जन घाट, तसेच श्री गणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे या दृष्टिकोनातून व्यवस्था केलेली असताना दुसरीकडे बहुतांशी ठाणेकरांनी घरीच विसर्जनावर भर दिला आहे. कोरोनामुळे हा निर्णय घेतला असून घरीच विसर्जन ही उत्तम संकल्पना असल्याचे मत ठाण्यातील गणेशभक्तांनी व्यक्त केले.
गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे आगमन आणि विसर्जनवेळी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची आवाहन गणेशभक्तांना सरकारने केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन विसर्जनस्थळी गर्दी टाळण्यासाठी ठाण्यातील गणेशभक्तांनी घरच्या घरी विसर्जनाला पसंती दिल्याचे दिसले. कोणी टब, कोणी पिंप, कोणी बादली तर कोणी स्टीलच्या पाण्याच्या टाकीत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. काहींनी चक्क हौद तयार करून त्यात विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
दीड दिवसांच्या बाप्पाचे घरच्या घरी विसर्जन केलेले असताना पाच दिवसांचा गणरायाचे विसर्जनदेखील घरीच करणार असल्याचे ठाणेकरांनी सांगितले. विशेष म्हणजे केवळ सोसायट्यांमध्ये नाही तर चाळींमध्येदेखील ही संकल्पना उदयास येत आहे. भविष्यात ही परंपरा पुढे चालूच ठेवणार असल्याचे ठाणेकरांनी सांगितले.
------------------------------
आम्ही घराच्या बाहेर टब ठेवून त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. विसर्जननंतर पाणी आणि मातीचा वापर झाडांसाठी केला.
- प्रीती कश्यप, प्राईड लक्झओरिया
.......
मी स्वतः मूर्तिकार आहे. माझ्या घरच्या बाप्पाची मूर्ती मी स्वतः साकारली. त्यात मातीसोबत कागदाचा वापर केला. मूर्ती विसर्जनसाठी हौद तयार करून त्यात मूर्तीचे विसर्जन केले. विसर्जननंतर उरलेली मातीचा पुन्हा वापर करणार आहे.
- नागराज नाईक, अरिहंत व्हिला
.....
कोविडमुळे गेल्या वर्षीच्या घरी विसर्जन करण्याचे ठरविले. त्यामुळे बादली किंवा एखादा पिंप आणून त्यात गणेशमूर्तीचे विसर्जन करू. उरलेली माती आणि पाणी झाडांना घातले जाईल.
- प्रकाश कुलकर्णी, लोढा लक्झोरिया
........
मंगळवारी रात्री ८ वा. घराबाहेर पाण्याची स्टीलची टाकी ठेवून त्यात विसर्जन करणार असून, उरलेली माती झाडांच्या मुळाशी सोडून पाणी खाडीच्या जवळ असलेल्या झाडांना घातले जाईल. गेल्या वर्षीपासून आम्ही घरच्याघरी विसर्जन करतो. यातून आनंद तर मिळतोच पर्यावरणही जपले जात आहे.
- विशाल पवार, कोळीवाडा