बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी, टिटवाळ्यात मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:47 AM2018-12-26T03:47:27+5:302018-12-26T03:47:43+5:30
वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि त्यात नाताळच्या सुटीचा दुहेरी योग जुळून आल्याने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
- उमेश जाधव
टिटवाळा : वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि त्यात नाताळच्या सुटीचा दुहेरी योग जुळून आल्याने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात बाप्पांच्या दर्शनासाठी मंगळवारी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी रात्री १२ वाजताच गणेशाला दुग्धाभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
सोमवारी रात्री दहा वाजतापासूनच गणेशभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री १२ वाजता देवाला अभिषेक घातल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर सभामंडपातील दर्शनबारी रात्रीपासून भाविकांनी खचाखच भरली होती. मंगळवारी सकाळी सहा वाजतापासून मंदिर आवारातील व तलावासभोवतालची दर्शन बारीदेखील भाविकांनी पूर्ण भरून गेली. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगच्या जागेतही भाविकांनी रांगा लावल्या होत्या.
श्री साईली मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले.
वर्षाची शेवटची अंगारकी चतुर्थी आणि नाताळची सुटी असल्याने गर्दी वाढल्याचे भिवंडी येथील गणेशभक्त काका पाटील यांनी सांगितले. लाखाच्या जवळपास भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी केला.