ठाण्यातील रायलादेवी तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 09:55 PM2018-01-31T21:55:07+5:302018-01-31T22:20:37+5:30
केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे.
ठाणे: कॉलेजला जातो, असे सांगून घरातून सकाळी बाहेर पडलेल्या सहा मित्रांपैकी ऋतिक गणेश कदम (१७, रा. पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याचा रायलादेवी तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बोटीला भगदाड पडल्यामुळे बोटीतील पाणी काढण्याचे भांडेच तलावात पडले. ते काढण्यासाठीच त्याने उडी मारली आणि तो बुडाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवेंद्र चंद्रकांत घाडगे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), राज संतोष पवार (१६, रा. किसननगर, ठाणे), ओम अनिल डुंबरे (१६, रा. पडवळनगर, ठाणे), विश्वजित सोमनाथ पोमणे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), आशिष संजीव शिंदे (१७, रा. पडवळनगर, ठाणे) आणि ऋतिक कदम हे ११ वीच्या वर्गात शिकणारे सहा मित्र बुधवारी दुपारी अचानक ठाण्याच्या रायलादेवी तलावातील बोटीतून सफर करण्यासाठी गेले. तलावातून जाण्यासाठी त्यांना बोटीतून जाण्याचा मोह आवरता आला नाही. ज्या बोटीत हे बसले तिला एक लहानसे भगदाड असल्यामुळे ती नादुरुस्त असल्याचे काही स्थानिकांनी त्यांना बजावलेही होते. पण, हौसेखातर त्यांनी बोटीतून सैर करण्याचा आनंद लुटण्याचा इरादा पक्का केला. ते साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास या बोटीतून निघाले. बोट काही अंतरावर गेली असतांनाच बोटीत त्या भगदाडातून पाणी शिरु लागले. ते पाणीही हे मित्र एका डब्याच्या सहाय्याने अगदी मजेने बाहेर काढत होते. अचानक डबा खाली पडला. हाच डबा काढण्यासाठी ऋतिकने कपडे काढून पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने उडीही मारली. पण तो डबा बाहेर काढण्यात अयशस्वी ठरला. गाळात रुतल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. इकडे आपला मित्र बुडाल्याने प्रचंड भेदरलेल्या या मित्रांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाने तासाभराने साधारण ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित पाचही जण या दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरी आपला मित्र गेल्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली. सकाळी कॉलेजला जाऊन येतो, इतकेच घरातून बाहेर पडतांना ऋतिक बोलला होता, असे त्याचे वडील गणेश कदम यांनी सांगितले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.