पालिकेच्या रेकॉर्ड रूममधून नस्ती गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:25 AM2017-10-05T01:25:17+5:302017-10-05T01:25:29+5:30
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात भाजपाचे ठाणे विभागीय उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
महापालिका क्षेत्रातील अंतिम भूखंड क्र. २०८/४ विकास प्रस्तावाच्या असलेल्या सर्व नस्त्या गहाळ झाल्याची चर्चा व काही तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी स्वत: यासंदर्भात पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून याची माहिती मागवली होती. परंतु, संबंधित विभागात ती नस्ती आढळूनच आली नाही. विशेष म्हणजे रेकॉर्ड रूममधूनदेखील ती गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे चर्चा केली असता, त्यांनी शहर विकास विभागात ती असेल, असे उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे, नस्ती कुठे गायब झाली, याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.