शिक्षकांच्या शिस्तीमुळेच कर्तव्यदक्ष अधिकारी घडलो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:40 AM2019-09-05T01:40:37+5:302019-09-05T01:41:03+5:30
ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदापर्यंत यशस्वी पल्ला गाठणाऱ्या विवेक फणसळकर यांना आपटे या मुख्याध्यापकांनी दिला आयाम
ठाणे : पुण्याच्या महाराष्ट्रीयन मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो. माध्यम इंग्रजी असले, तरी मराठी संस्कृती आणि सण शाळेत शिक्षकांकडून साजरे केले जात असत. शाळेचे संस्थाचालक शंकर ओगले आणि मुख्याध्यापक राजाराम विनायक आपटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कडक शिस्त लावली. याच शिस्तीमुळे आपण घडलो आणि आज या पदापर्यंत पोहोचलो आहोत, अशा शब्दांत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. शिक्षकांना रागवायचा, कान धरायचा आजही अधिकार आहे, असे ते सांगतात.
कुमुदिनी पंंिडत या शिक्षिका हिंदी आणि मराठी शिकवायच्या. त्यांनी समाजकार्याचीही आवड निर्माण केली. नववीत असताना त्यांनी २०० मुलांच्या चमूला पांजरपोळ येथे नेले होते. शाळेने १९७३ ते १९८५ या काळात पुण्याजवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून धरण उभारले. आम्हीही धरणाच्या कामाला गेलो होतो. त्यावेळी जास्त जिलेबी कोण खाणार, अशी अनोखी पैज आपटेसरांनी लावली. महेंद्र हसभनीस याने ४१ जिलेब्या खाऊन बक्षीस मिळविले होते. शालेत आपटेसरांनी घडविलेले विद्यार्थी पुढे जीवनाच्या परीक्षेत कोणी नापास झाले नाही. सर्वांनाही बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. त्यांनी अनेक चांगले संस्कार माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांवर रुजवले. त्यांचे ऋण हे कायम राहणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांची आवड रुजवली...
संस्थाचालक राजाराम ओगले यांनी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वक्तृत्व, कला, क्रीडा यांचीही आवड रुजवली. या सर्वांमध्ये विद्यार्थी पारंगत असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे कला, क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये निपुणता येण्यासाठी विद्यार्थ्यांना ते घडवित असत.
मुख्याध्यापक राजाराम आपटे हे पाचवी ते दहावीच्या वर्गांना शिकवायचे. प्रत्येक विद्यार्थ्याला ते वैयक्तिक ओळखत असत. हे त्यांचे वैशिष्ट्य होते. विद्यार्थ्यांच्या घरगुती अडचणीही त्यांना माहीत असत. यातूनच ते त्यांची काळजीही घ्यायचे. उन्हाळी सुटीच्या वेळी १९८० च्या दशकामध्ये दहावीच्या वर्गाचे गणित आणि शास्त्र या विषयांचे ते जादा क्लास घेत असत. त्यांची मूर्ती आणि आठवण आजही समोर आहे. कडक शिस्तीचे शिक्षक अशी त्यांची ख्याती होती.
इंग्रजीवरचे प्रभुत्व त्यांचंच देणं...
लि.म. अभ्यंकर हे त्यावेळी इंग्रजी विषय शिकवायचे. गणित, विज्ञान किंवा अभियांत्रिकी अशा वेगवेगळ््या क्षेत्रात जरी विद्यार्थ्यांनी भरारी घेतली, तरी त्यांना इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आले पाहिजे, या मताचे ते होते. त्यामुळे इंग्रजीवरचे प्रभुत्व ही त्यांचीच देण असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. शाळेत शिक्षक दिनाच्या समारंभात दहावीचे विद्यार्थी मुख्याध्यापकांसह शिक्षकाच्या भूमिकेत असायचे. या एका दिवसात संपूर्ण शाळेला विद्यार्थी हाताळायचे. यातूनच शिक्षकाचे महत्त्व कळायचे.