भिवंडीत महानगरपालिकेच्या तरण तलावात तरूणाचा बुडून मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:44 PM2019-02-10T23:44:31+5:302019-02-10T23:50:05+5:30
भिवंडी : शहरात धोबीतलाव येथील स्व.परशराम टावरे क्रिडा संकुलात असलेल्या महानगरपालिकेच्या तरण तलावात रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या युवकाचा ...
भिवंडी : शहरात धोबीतलाव येथील स्व.परशराम टावरे क्रिडा संकुलात असलेल्या महानगरपालिकेच्या तरण तलावात रविवारी दुपारी मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु झाला. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या तलावात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
फरमान खान (१९)असे तरण तलावात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नांव असून ते शहरातील भंडारी कंपाऊण्ड येथे रहात होता. तो रविवारी दुपारी मित्रांसोबत धोबीतलाव येथील महानगरपालिकेच्या तरणतलावात पोहोण्यास गेला असता त्यास खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. महानगरपालिकेचे तरण तलावाचे व्यवस्थापन खाजगी संस्था सांभाळीत आहे. या पुर्वी पाण्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या नंतर मुलांना प्रशिक्षण देणारे शिक्षक व जीवन रक्षकांची नेमणूक करावी, असा आदेश सदर संस्थेला देण्यात आले होते. तरण तलावात दुपारच्या सुमारास फरमान खान हा युवक मित्रांसोबत पोहण्यास गेला असता तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे जीवनरक्षक नसल्यानेच हि घटना घडली असून या घटनेस सर्वस्वी व्यवस्थापक व ठेकेदार संस्था जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
फरमान खान हा एनसीसी कॅडेट होता व त्यास सैन्य दलात जाण्याची अपार इच्छा असल्याने त्याने सैन्य भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा नुकतीच दिली होती. त्याचा निकाल लवकरच लागणार असल्याने तो आनंदित होता,अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सादिक बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी रु ग्णालयात शवविच्छेदना साठी रवाना केला आहे. सदर शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.