डंपिंगची आग विझविण्यासाठी पालिकेची धडपड; 45 लाखांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 08:57 PM2018-12-11T20:57:08+5:302018-12-11T20:57:23+5:30
अंबरनाथ पालिकेचे डंपिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डंपिंग ग्राऊंडवर माती भराव करण्याचे काम सुरु केले आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेचे डंपिंग ग्राऊंड हे सातत्याने पेटत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डंपिंग ग्राऊंडवर माती भराव करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच कच-यामधून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरु केले आहे. डंपिंगवरील उपाययोजनेसाठी पालिकेने 45 लाखांची स्वतंत्र आर्थिक तरतुद देखील केली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेचे डंपिंग ग्राऊंड फॉरेस्ट नाक्यावर असुन या ठिकाणी टाकण्यात येणा-या कच-यावर प्रक्रिया होत नसल्याने या ठिकाणी कच-याला आग लावण्याचे प्रकार वाढले होते. डंपिंगला सतत आग लागत असल्याने त्याच्या धुराचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. गेली अनेक वर्ष दुर्गंधीचा त्रास सहन केल्यावर गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना धुराचाही त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात आंदोलने देखील केले होते. मात्र ही समस्या सातत्याने वाढत असल्याने या डंपिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने डंपिंगच्या कच-यावर माती भराव करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच कच-यामधून निघणारा गॅस बाहेर काढण्यासाठी लोखंडी पाईप टाकण्याचे काम सुरु केले आहे. डंपिंगवर माती भराव करण्यासाठी 30 लाखांची तर पाईप टाकण्यासाठी 15 लाखांची असे एकूण 45 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. युद्ध पातळीवर हे काम सुरु झाले असून काही प्रमाणात त्रास देखील कमी झाला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून पालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर माती भराव करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी अजुनही माती भराव झालेला नाही त्या ठिकाणी आगीचे सत्र सुरु आहे. मात्र आगीचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांना होणारा त्रास पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. मात्र रस्त्याच्या लगत असलेला कचरा अजुनही पेटत असल्याने त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे डंपिंग ग्राऊंडवर येणारा कचरा कसा कमी होईल यासाठी पालिकेने प्रयत्न सुरु केले आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. मुख्याधिकारी देविदास पवार यांनी आज पुन्हा पालिकेच्या डंपिंगची पाहणी केली. या ठिकाणी सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतल्यावर प्रभागातील कचरा वर्गीकरण प्रकल्पांना भेट दिली. घंटाकाडी चालकांनाही कचरा संकलीत करतांना योग्य प्रकारे कचरा हाताळण्याचा सल्ला दिला. पालिकेच्या वतीने प्रभागनिहाय कचरा संकलनासाठी उपाययोजना सुरु केले आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी पवार यांनी दिले आहे.