खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी झाला कमी, तत्काळ खड्डे बुजविण्याची पालिकेची हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:08 PM2018-08-04T17:08:44+5:302018-08-04T17:11:32+5:30
रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आता ठाणे महापालिकेने प्रतीसाद कालावधी कमी केला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एखाद्या खड्याची तक्रार केली तर अवघ्या दोन तासाच्याच आता खड्डा बुजविण्यात येऊन तेथून वाहतुकसुध्दा सुरु होईल असा दावा पालिकेने केला आहे.
ठाणे - रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आता पालिकेने आणखी एक फंडा पुढे आणला आहे. रस्त्यावरील खड्डा दाखवा तो आम्ही दोन तासात बुजवू असा दावा पालिकेने केला आहे. खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी कमी केला असून तत्काळ खडड्डे बुजविण्याची हमी दिली आहे. तसेच पालिकेने स्टारग्रेड अॅपच्या माध्यमातून आलेल्या खड्यांच्या तक्रारींवरसुध्दा तत्काळ उपाय योजना करण्याचा दावा केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यातील काही तंत्रज्ञान यशस्वी झाले तर काही तंत्रज्ञान अक्षरश: फेल झाले आहेत. परंतु पावसाने उसंत घेतल्यानंतर पालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत ७५ टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत खड्डे पाच ते सहा दिवसात बुजविण्यात येतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पालिकेने ब्रीजवरील खड्डे बुजविण्यासाठी अक्वा पॅच या तंज्ञत्रानाचा वापर केला असून त्यानुसार ८.१८ स्केअर मीटरचे खड्डे या तंत्रज्ञानापासून बुजविण्यात आले आहेत. यासाठी ६४ हजार ८०० रुपयांचा खर्च झालेला आहे. तर इस्मॅक पीआर या पॉलीमर तंत्रज्ञानाचा वापर सुध्दा खड्डे बुजविण्यासाठी झाला असून त्यानुसार या तंत्रज्ञानानुसार १११.३६ स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. यासाठी १ लाख ६० हजार ८३८ रुपयांचा खर्च झालेला आहे. एम सीक्स्टी ग्रेडच्या तंत्रज्ञानात ३९०० स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले असून यासाठी ४२ लाख ३८ हजार १३० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर रेन पॉलीमर या तंत्रज्ञानात ९०९.९ स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले असून यासाठी १५ लाख ९३ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.
स्टार ग्रेडवरील तक्रारीसुध्दा तत्काळ सोडविणार
आता तत्काळ खड्डे बुजविण्यासाठीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्यात आला असून खड्याची तक्रार करा, पुढील दोन तासांच्या आत खड्डा बुजविला जाईल अशी हमी पालिकेने दिली आहे. तसेच स्टार ग्रेड अॅपवर सुध्दा खड्यांच्या तक्रारी आल्यास त्याचे निरासरण तत्काळ केले जाणार आहे. त्यातही यापूर्वी या अॅपवर नागरीकांना केवळ तक्रारीच करता येत होत्या. परंतु आता नागरीकांना केलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली, खड्डा बुजविण्यात आला अथवा नाही, याची माहिती त्याच्या मोबाईलवर दिली जाणार आहे.