निवडणूक आचारसंहितेमुळे ठाणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची बदली प्रक्रिया स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:19 AM2019-04-05T02:19:16+5:302019-04-05T02:19:48+5:30
लोकमत इफेक्ट : कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश, कार्यमुक्त न करण्याच्या सूचना
सुरेश लोखंडे
ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. तत्पूर्वी, ठाणे जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक व कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. या शिक्षकांना २ मे नंतर आपापल्या नवीन शाळांवर हजर होण्याचे आदेशही मिळाले होते; मात्र आचारसंहिता संपेपर्यंत आता या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होता येणार नसल्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी जारी केले आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांचा समावेश आहे.
‘राज्यातील शिक्षकांच्या बदल्या स्थगित; ठाण्यासह कोकणातील शिक्षक बदल्या जैसे थे’ या मथळ्याखाली २४ मार्च रोजी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून या विषयावर प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बदली झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपेपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे आदेश ३० मार्च रोजी जारी केले. त्यामुळे नवीन शाळेवर २ मे पासून शिक्षक हजर होणार होते; पण आता आयुक्तांच्या आदेशामुळे ते रखडले आहे.
कोकणातील जिल्हा परिषदांचे शिक्षक वगळता राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आचारसंहितेमुळे तात्पुरती थांबवण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २२ मार्च रोजी जारी केले होते. त्यातून कोकणातील शिक्षकांना मात्र वगळले होते. ठाण्यासह कोकणातील शिक्षकांची आॅनलाइन बदली प्रक्रिया मागील सुमारे एक वर्षापासून रखडली होती. ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण झाली. त्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांचा समावेश होता.
बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेशही जारी झाले होते. त्यानुसार, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी या शिक्षकांना हजर व्हावे लागणार होते. म्हणजे, १ मेचा महाराष्टÑ दिवस साजरा करून २ मेपासून त्यांना नवीन शाळांवर हजर होण्याचे आदेश होते; पण आता नव्या आदेशानुसार आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे कदाचित २३ मेनंतर या शिक्षकांना त्यांच्या नवीन शाळेवर हजर व्हावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.