इलेक्शन ड्युटीमुळे केडीएमसीत शुकशुकाट
By admin | Published: May 24, 2017 12:56 AM2017-05-24T00:56:57+5:302017-05-24T00:56:57+5:30
भिवंडी महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : भिवंडी महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी अशा सुमारे साडेपाचशे जणांना इलेक्शन डयुटी लावली आहे. त्यामुळे मंगळवारपासूनच महापालिकेत शुकशुकाट पसरला असून मतमोजणीच्या दिवसांपर्यंत म्हणजेच शुक्रवारपर्यंत हे चित्र राहणार आहे.
याआधी उल्हासनगर आणि वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठीही केडीएमसीचे कर्मचाऱ्यांना बोलावले होते. भिवंडीसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील, प्रभारी सचिव संजय जाधव आणि सहायक आयुक्त विनय कुलकर्णी या प्रमुख अधिकाऱ्यांसह अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, लिपीक, शिपाई, कामगार, सफाई कर्मचाऱ्यांना इलेक्शन डयुटी लावण्यात आली आहे.
हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारपासूनच भिवंडीला गेल्याने दालने रिकामी पडली आहेत. ही परिस्थिती शुक्रवारपर्यंत राहणार आहे. इलेक्शन डुटी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर देखील याचा परिणाम झाला आहे.
विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी नसल्याने परत जावे लागत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीही पालिका कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. मात्र, याचा फटका सामान्यांना बसतो.