ठाण्यातील रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला मिळाले दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:35 PM2018-07-11T21:35:09+5:302018-07-11T21:44:47+5:30
एरव्ही, प्रवाशांशी उद्धट वर्तन, भाडे नाकारणे अशा एक ना अनेक कारणांनी रिक्षा चालक बदनाम झाले असतांनाच ठाण्यातील अतुल यादव या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षात विसरलेली महिलेची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा केली. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणे : वागळे इस्टेट येथील अतुल कुमार यादव (२८) या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे तृषिता शिंदे-कामत (३४, रा. ठाणे) यांना त्यांचे चांदीचे दागिने, घड्याळ, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज बुधवारी परत मिळाला. त्याने नौपाडा पोलीस ठाण्यात या महिला प्रवाशाची बॅग आणून दिल्यानंतर पोलिसांनी कामत यांना हा ऐवज सुपूर्द केला. त्यानंतर, यादव यांचा पोलिसांनी सत्कारही केला.
शिंदे यांनी मंगळवारी यादव यांच्या रिक्षातून नौपाड्यातील तीनपेट्रोलपंप ते राममारुती रोड असा प्रवास केला. राममारुती रोड येथे त्यांनी भाडे देऊन रिक्षातून त्या निघून गेल्या. मात्र, जाताना त्यांची बॅग त्या रिक्षातच विसरल्या. या बॅगेत त्यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, क्रेडिटकार्ड, मोबाइलसह चांदीचे दागिनेही होते. आपली बॅग रिक्षातच विसरल्याचे शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आपल्या रिक्षात एका महिलेची बॅग विसरल्याचे लक्षात येताच यादव यांनी बुधवारी नौपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेव्हा शिंदे यांना पाचारण करून त्यांच्या बॅगेतील सामानाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ती बॅग त्यांना सुपूर्द केली. यादव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल जाधव यांच्यासह निरीक्षक अविनाश सोंडकर आणि पोलीस हवालदार दिलीप माळवे यांनी त्यांचा पोलीस ठाण्यात छोटेखानी विशेष सत्कारही केला.
‘‘अतुल यादव यांच्यासारख्या प्रामाणिक रिक्षाचालकांसारखी इतर रिक्षाचालकांनीही प्रेरणा घ्यावी, या हेतूने त्यांचा नौपाडा पोलिसांतर्फे सत्कार केला. आपली बॅग सर्व मौल्यवान वस्तूंसह परत मिळाल्याबद्दल तृषिता शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.’’
चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे.