सदोष वेळापत्रकामुळे मध्य रेल्वेकडूनच मृत्यूचा सापळा?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 01:08 AM2019-06-02T01:08:39+5:302019-06-02T06:31:25+5:30
मागील काही वर्षांपासून ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात ट्रान्स-हार्बरची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत ठाण्यात लोकलमध्ये चढणे जीवावर बेतते.
ठाणे : ठाण्यात ११ वाजून ११ मिनिटांनी आणि ११ वाजून १९ मिनिटांनी येणाऱ्या कल्याण लोकल हा मध्य रेल्वेने प्रवाशांकरिता टाकलेला मृत्यूचा सापळा असल्याची या उपनगरीय रेल्वेला लटकून प्रवास करणाऱ्यांची ठाम भावना आहे. या गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत आणि त्यांच्याअगोदर पाठोपाठ ठाणे लोकल असल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हस्तिदंती मनोºयात बसून वेळापत्रक तयार करणाऱ्या मठ्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी, अशी प्रवाशांची भावना आहे. मागील काही वर्षांपासून ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात ट्रान्स-हार्बरची सेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विशिष्ट वेळेत ठाण्यात लोकलमध्ये चढणे जीवावर बेतते. सकाळी ऑफिसला जाण्याच्यावेळी जशी गर्दी असते, तशीच गर्दी रात्री सव्वाअकरा ते साडेअकरा वाजता ठाणे स्थानकावर असते, यावर क्षणभर कुणी विश्वास ठेवणार नाही.
ठाणे स्थानकात रात्री १० वाजून ५१ मिनिटांची कल्याण, १० वाजून ५५ मिनिटांची टिटवाळा आणि १० वाजून ५९ मिनिटांची कल्याण लोकल आहे. त्यानंतर, दोन ठाणे लोकल असून मग ११ वाजून ११ मिनिटांनी कल्याण लोकल आहे. ही लोकल गेल्यावर पुन्हा ठाणे लोकल येते. त्यानंतर, ११ वाजून १९ मिनिटांची कल्याण लोकल येते. या दोन्ही कल्याण लोकल कधीही वेळेवर नसतात. त्यामधील एक रद्द केली जाते किंवा उशिरा येणार असते. दुसरी कल्याण लोकलही वेळेवर येतेच, असे नाही. त्यामुळे १० वाजून ५९ ची कल्याण लोकल (जी बऱ्याचदा वेळेवर असल्याने रिकामी जाते) गेल्यावर ठाण्यात येणाºया तीन ठाणे लोकलचे आणि त्याचवेळी ट्रान्स-हार्बरच्या लोकलमधून येणाºया तीन लोकलचे प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-२ वर खच्चून जमलेले असतात. बऱ्याचदा पुढील २० ते २५ मिनिटे लोकल नसल्याने या लोकलला लटकून, आत शिरण्याकरिता धडपडणाºया, ओरडणाºया प्रवाशांना घेऊन या लोकल जातात.
ठाणे लोकलमधून मुंबईतील खासकरून भायखळा येथील व्यापारी, कर्मचारी येतात. ते मुख्यत्वे कळवा, मुंब्रा किंवा पुढे जाणारे असतात. त्यांना पर्याय नसल्याने ठाणे लोकल पकडून ठाण्यात येतात. त्यामुळे त्यांची गर्दी, त्याचवेळी ट्रान्स-हार्बर मार्गावर १० वाजून ४४ मिनिटांची, १० वाजून ५५ मिनिटांची तसेच ११ वाजून सहा मिनिटांच्या लोकल ठाण्यात येतात. वाशी येथे घाऊक बाजारपेठ असल्याने तेथील व्यापारी, आयटी पार्क तसेच बरीच कार्यालये नवी मुंबईत स्थलांतरित झाल्यामुळे तेथील कर्मचारी अशी ही गर्दी रात्री ११ च्या सुमारास ठाणे स्थानकात होते. त्यात बऱ्याचवेळ लोकल नसल्याने ११ वाजून १९ मिनिटांच्या गाडीत जीव धोक्यात घालून प्रवास करतात. ‘अरे आगे बढो’ म्हणत अंगातील जोर काढून पुढे उभे असलेल्या प्रवाशांना अक्षरश: रेटत असतात. काही प्रवासी दारात दोन बोटांच्या चिमटीत दरवाजाच्या वरच्या बाजूस पकडून फुटबोर्डवर लटकत असतात.
टिटवाळ्यापुढील प्रवाशांचे हाल
१० वाजून ५५ मिनिटांची टिटवाळा लोकल गेली की, थेट ११ वाजून ३४ मिनिटांची कसारा लोकल आहे. त्यामुळे टिटवाळ्यापुढील प्रवाशांसाठी टिटवाळा गाडी गेली की, ४० मिनिटे गाडी नाही. पूर्वीच्या वेळापत्रकात ११ वाजून १६ मिनिटांची टिटवाळा लोकल होती, ती रद्द केली. त्यामुळे प्रवाशांच्या हालअपेष्टांत अधिकच भर पडली आहे.
वातानुकूलित दालनात बसून वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाच्या निर्बुद्ध कारभारामुळे लटकूनच प्रवास करावा लागत असल्याबद्दल जाब कुणाला विचारायचा, असा सवाल प्रवासी करत आहेत. परराज्यांतून उच्चपदावर येणाऱ्या व वातानुकूलित खोलीत बसून वेळापत्रक बनवणाऱ्यांनी एकदा लोकलमधून प्रवास करावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.