उल्हास नदीच्या पुरामुळे १३ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:18 PM2019-08-04T23:18:34+5:302019-08-04T23:18:47+5:30
एनडीआरएफने केली ७२ जणांची सुटका; कल्याण-मुरबाड- नगर वाहतूक पूर्णत: ठप्प
म्हारळ : पावसाच्या संततधारेमुळे उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यामुळे उल्हास नदीलगतच्या म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्कतुटला आहे. या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कल्याण तालुक्यात पुरात अडकलेल्या ७२ जणांना एनडीआरएफ आणि महापालिकेच्या आपत्कालीन पथकाने सुरक्षित बाहेर काढले.
बारवी धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे रविवारी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पांजरापोळ आणि रायता येथील कल्याण-मुरबाड-नगरला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. परिणामी, संपूर्ण वाहतूक बंद झाली. शनिवारी या मार्गावरील वाहने अन्य मार्गावरून वळवली होती. परंतु, सर्वच ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिसरातील १३ गावांचा संपर्क तुटला. तसेच ३० ते ४० गावांनाही पुराचा फटका बसला. अनेक गावांमधील भातशेतातही पाणी शिरल्याने शेती नष्ट झाली आहे.
बारवी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने शनिवारी रात्रीच धोक्याच्या इशारा दिला होता. तसेच २६ जुलै २००५ च्या आठवणी जाग्या झाल्याने भीतीचे वातावरण होते. परिणामी, चिंतेने नागरिकांनी रात्र जागूनच काढली. पुराचे पाणी कल्याण-मुरबाड महामार्गावर आठ ते दहा फुटांपर्यंत वाढल्याने म्हारळ, कांबा, वरप परिसर जलमय झाला. कांबा येथील मोरयानगर येथील नागरिकांना कांबा येथील गावदेवी मंदिर, जिल्हा परिषद शाळा तसेच वरप येथील सेक्रेड हार्ट हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले.
आणे येथील ग्रामस्थांनी पुन्हा शेजारील टेकडीवर जाऊन आश्रय घेतला. म्हारळ येथील सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रायता गावातील १० ते १५ घरे पाण्यात बुडाली. शहाड येथील मोहना रोडवर आठ फूट पाणी साचल्याने लगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावरील मार्बलची दुकाने आणि लाकडाच्या वखारी पाण्यात बुडाल्या. मोहना रोडवरील बंदरपाडा येथील ६० घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे तेथील रहिवाशांना शहाड येथील पाटीदार भवन आणि अन्यत्र हलवण्यात आले आहे. शहाड पुलाजवळील पेट्रोलपंपातही पाणी शिरले. वडवली येथील १५ ते २० घरे पाण्यात बुडाली.