पुरामुळे ठाणे जिल्ह्यात झाली लाखोंची हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 02:19 AM2019-07-30T02:19:52+5:302019-07-30T02:20:15+5:30
पूरग्रस्तांचे तीन हजार पंचनामे पूर्ण : राबोडीत इमारतीचा
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार या पूरपरिस्थितीच्या काळात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारपासून करण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन हजार ७१५ पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील या घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून सुरू आहेत. याप्रमाणेच सोमवारी दुपारीही राबोडीतील इमारतीचा भाग कोसळला, तर उल्हासनगरमध्ये ११० घरांमध्ये पाणी शिरले आहे.
जिल्ह्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. यादरम्यान राबोडी येथील पंचगंगा इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. या इमारतीत रहिवासी असतानाही हा भाग कोसळला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २० मधील अशोक पाटील कॉलनीत सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे ११० घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल झाले. कल्याण तालुक्यातील रायता गावाजवळील दिनेशकुमार ढेरिया यांच्या डेअरी फार्ममधील १६ गायी, सात वासरे आदी सुमारे २९ जनावरे शुक्रवारच्या रात्री पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतावशेष मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षातून स्पष्ट करण्यात आले.
बदलापूर शहरात सर्वाधिक नुकसान
या पूरपरिस्थितीच्या कालावधीत अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहरास सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना जीवघेण्या समस्येला तोंड द्यावे लागले. याप्रमाणेच उल्हासनगरमधील वालधुनी नदीकाठावरील घरांमध्येदेखील पुराचे पाणी शिरले आहे. तर, कल्याण, भिवंडीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुरबाड, शहापूर तालुक्यांतही नदीकाठालगतच्या भातशेतीचे नुकसान झाले. या पूरस्थितीच्या दोन दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांचे नुकसान सद्य:स्थितीत दिसून येत आहे. यांचे नुकसानभरपाईच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे आदेश जारी झाले. त्यानुसार, संध्याकाळपर्यंत दोन हजार ७०० पेक्षा अधिक पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याचे आढळून आले.
अंबरनाथमध्ये शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली
अंबरनाथ तालुक्यातील रेल्वेच्या काकोळे धरणातील पाणी खालच्या बंधाऱ्यात शिरून ब्रिटिशकालीन भिंतीला भगदाड पडले. यामुळे या परिसरातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यासारखे शेतीनुकसानीसह घरांच्या पडझडीचे पंचनामे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तहसीलदार यंत्रणेकडून पंचनाम्यास प्रारंभ केला आहे. अंबरनाथ तालुक्यात आतापर्यंत एक हजार ५०० पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहेत. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यात ९७० पंचनाम्यांचे काम झाले. भिवंडीत आतापर्यंत २४५ पंचनामे संध्याकाळपर्यंत झाले. महसूल विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तालुक्यांमध्ये सुरू आहे.