दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:39 AM2019-03-04T05:39:47+5:302019-03-04T05:39:56+5:30
दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटेल व लोकल वाहतुकीतील अडथळे दूर होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
ठाणे : मीनाताई चौक व संत नामदेव चौक येथील उड्डाणपुलांचे उद्घाटन, दिवा रेल्वेस्थानकात नव्याने बांधणार असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन व दिवा, डायघर, पडलेगाव येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे भूमिपूजन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. दिव्यातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी फुटेल व लोकल वाहतुकीतील अडथळे दूर होतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शिवसेना आश्वासने पाळणारा पक्ष असल्याचा टोला आदित्य यांनी नाव न घेता अन्य राजकीय पक्षांना लगावला. दिव्यात उड्डाणपूल बांधताना बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन केले जाईल, त्यांना पालिकेकडून पक्की घरे मिळतील. दिव्यातील डम्पिंगही हलवण्यात येणार असून तेथे एज्युकेशन हब होणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ७२३ मीटरचा हा पूल असून त्याचे काम सोमवारपासून सुरू होईल. ते १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. २४० कोटींची पाणीयोजना, शीळफाटा येथे ११ कोटींची नवीन पाइपलाइन, मलनि:सारण योजनेसाठी २२० कोटींची कामे सर्वसाधारण सभेत मंजूर झाली असून त्याची निविदा अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त संजीव जैस्वाल यांनी सांगितले. या कार्यक्रमास खासदार राजन विचारे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.