'डोंबिवली उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घाला'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:49 PM2019-06-20T23:49:25+5:302019-06-20T23:49:34+5:30
ऑडिटसाठी आयआयटीला पत्र
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या शहरातील कोपर दिशेकडील धोकादायक उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिली आहे. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनीलकुमार जैन यांच्या दालनात ३० मे रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुक्त गोविंद बोडके यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त महापालिकेला पाच दिवसांपूर्वी मिळाले आहे. त्यात, वरील सूचना केली आहे. मात्र, महापालिकेने अजूनही त्याची अंमलबजावणी न केल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे.
रेल्वेकडून इतिवृत्त मिळताच महापालिकेच्या शहर अभियंत्यांच्या कार्यालयाने अवजड वाहनांना बंदी घालण्याबाबत वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्यासंदर्भात डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेला वरिष्ठांकडून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. परिणामी, अवजड वाहनांना अद्याप पुलावर बंदी घालण्यात आलेली नाही. पुलावर नेहमी वाहतूककोंडी होते. मात्र, पूल धोकादायक असल्याने पावसाळ्यात अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तत्काळ हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे नियोजन करावे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुलाचे पूर्ण आॅडिट करण्यासाठी महापालिकेने व्हीजेटीआयला आठ दिवसांपूर्वी पत्र दिले आहे. मात्र, त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याने आॅडिट थांबले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
डोंबिवलीतील कोपर उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे पत्र मला मिळाले आहे. त्यासंदर्भात वाहतुकीत बदल, त्याचे नियोजन याबाबत सविस्तर नोटीफिकेशन एकदोन दिवसात आम्ही जाहीर करणार आहोत.
- अमित काळे,
उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे