कल्याण-बदलापूर महामार्गावर कोंडी, वाहनांच्या लांबचलांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:03 AM2017-10-07T01:03:35+5:302017-10-07T01:04:04+5:30
शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही.
अंबरनाथ : शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही.
अंबरनाथमध्ये मुख्य महामार्गावर ही कोंडी झालेली होती. दुपारी १२ वाजता अंबरनाथ पोलीस ठाणे ते मटका चौक या मार्गावर कोंडी झालेली होती. वाहने १० ते १५ मिनिटे एकाच जागेवर उभी होती. ही वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेमार्फत करण्यात येत होता. मात्र, अनेक वाहनचालकांनी चुकीच्या ठिकाणाहून वाहने घुसवल्यामुळे गाड्या जागच्या जागीच उभ्या राहिल्या.
अखेर, मटका चौक ते पालिका कार्यालयासमोरील वाहतूक प्रत्येक लेननुसार सुरू केल्यावर दुपारी २ नंतर ही वाहतूककोंडी सोडवण्यात वाहतूक विभागाला यश आले. या कोंडीचा सर्वाधिक फटका हा शाळेच्या बसचालकांना सहन करावा लागला. शाळेच्या बस या कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब झाला. शहरातील रस्ता रुंद असतानाही अशा प्रकारे कोंडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशी कोंडी होत असल्याने वाहनचालकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.