डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:33 AM2019-03-11T00:33:42+5:302019-03-11T00:34:03+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आवलंबून आहे.
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आवलंबून आहे. मात्र ठिकठिकाणच्या केंद्रांमधील सुमारे ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली आहेत. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील गावखेडे, पाड्यांची आरोग्य सेवा पार कोलमडली आहे. त्याकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य केंद्रांमधील प्रमुख वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ११ पदांच्या रिक्ततेमुळे ठिकठिकाणच्या रूग्णांवर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेविरोधात ग्रामीण, आदिवासी भागातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आदिवासी, दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूर तालुक्यात सर्वाधिक सहा प्रमुख डॉक्टरांची पदे रिक्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णांवरील उपचारासाठी ठाणे येथे सामान्य रु ग्णालयासह जिल्ह्यात ठिकठिकाणी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १८५ आरोग्य उपकेंद्र, चार वैद्यकीय मदत पथके, सहा ग्रामीण रूग्णालये, दोन उपजिल्हा रु ग्णालये आदी २०८ रूग्णालयांत आरोग्य यंत्रणा कार्यरत आहेत; मात्र मोठी रूग्णालये ही बहुतांश शहरी भागास लागून आहे.
एकीकडे आदिवासी भागात कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत असताना डॉक्टरांची कमतरता असणे हे खूपच संतापजनक आहे. आदिवासींच्या विकासाच्या गप्पा मारत असताना या ग्रामीण भागाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे.
आदिवासी रुग्णांचे हाल
दुर्गम व डोंगराळ भागातील रूग्ण जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांवरच आवलंबून आहेत. मात्र तेथेही डॉक्टरांची उपलब्धता नसल्यामुळे ग्रामीण, आदिवासी रूग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आरोग्य व सकस आहारविषयक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण अशा महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात.