मूल्यमापन न झाल्याने शिक्षण क्षेत्राची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:49 AM2019-07-31T00:49:52+5:302019-07-31T00:50:12+5:30
अजय देशमुख : डोंबिवलीत ‘सीबीसीएस’ विषयावर कार्यशाळा, ७० शिक्षक उपस्थित
डोंबिवली : शिक्षकांनी जे शिकवले त्याचे विद्यार्थ्याला योग्य आकलन झाले आहे का, याचे मूल्यमापन होत नसल्याने शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातर्फे मंगळवारी स्वामी विवेकानंद राणाप्रताप शाळेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. या कार्यशाळेला कल्याण-डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांतील ७० शिक्षक उपस्थितीत होते. यावेळी कुलपतींच्या मुंबई विद्यापीठ परिषदेवरील प्रतिनिधी दीपक मुकादम, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा पळसुलेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देशमुख यांनी सांगितले, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठ यांनी मिळून चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही योजना आणली आहे. तिचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. शिक्षकांचा जोपर्यंत संवाद होणार नाही, तोपर्यंत या योजनेची उकल होणार नाही. शिक्षकांनी प्रथम ही योजना समजून घेऊन त्यानंतर ती विद्यार्थ्याना सांगितली पाहिजे.
या योजनेमुळे उत्क्रांतीला व कल्पनाशक्तीला चालना मिळणार आहे. त्यासाठी ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा गणिताचा अभ्यास चांगला आहे. तर त्याने इतर विषयांचा विचार करावा, म्हणून सीबीसीएस ही योजना आणली आहे. एखादा अभ्यासक्रम चालू करण्याची इच्छा व्यक्त करणे सोपे असते. परंतु, त्याच्या मर्यादा काय असू शकतात, याचाही विचार झाला पाहिजे.
देशमुख पुढे म्हणाले, विद्यापीठ हे महाविद्यालयांसाठीच आहेत. महाविद्यालये आहेत म्हणून विद्यापीठ आहे. सर्व शैक्षणिक संस्था या सक्षमपणे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कसोटीला खऱ्या उतरतात की नाही हे पाहण्याची गरज आहे. शिक्षकांची गुणवत्ता कशी आहे, त्यावर शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अवलंबून असते. शिक्षणाचा विकास हा गुरूकुल ते कुलगुरू या पद्धतीने साधायचा आहे. शैक्षणिक विकास साधण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाचा आणि विद्यापीठाच्या माध्यमातून समाजाचा विकास होईल. त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे. उच्च शिक्षणाचा यज्ञ कसा प्रज्वलित राहील आणि त्यातून राष्ट्र दैदिप्यमान कसे होईल, हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे, असे ही त्यांनी सांगितले.
कोणत्याही योजनेचे स्वागत मोठ्या उत्साहाने होते. मात्र, त्यात काही त्रुटी राहिल्या तर त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई विद्यापीठाची ओळख ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अशी आहे. ही ओळख पुसायची की शिक्षणाची प्रशस्त दालने उभी करायची हा मोलाचा प्रश्न आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा भाषेचा अभ्यास चांगला आहे. परंतु, त्या विद्यार्थ्याने मग मानवाच्या इतर अंतरंगाची ओळख करून घ्यायची नाही का, असा सवाल ही देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.
विधी महाविद्यालयाचा प्रस्ताव
सुभाष वाघमारे म्हणाले, संस्थेतर्फे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठाला प्रस्ताव पाठविणार आहोत. ठाणे जिल्हा परिसरात विधी महाविद्यालय नसल्याने ते डोंबिवलीत सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची सोय होईल. तसेच इतर ही काही अभ्यासक्रम सुरू करता आले तर ते सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.