जागेअभावी पाच विहिरींचे ५६ लाख रुपये गेले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:00 AM2020-06-12T00:00:54+5:302020-06-12T00:01:11+5:30
फक्त पालीच्या विहिरीचे काम पूर्ण : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजुरी
मयूर तांबडे।
नवीन पनवेल : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सहा विहिरींपैकी पाच विहिरींचे ५६ लाख रुपये जागेअभावी परत गेले आहेत. त्यातील केवळ पाली येथील एका विहिरीचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल परिसरात विविध प्रोजेक्ट नव्याने येत आहेत. तसेच काही प्रोजेक्टचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पनवेलमधील जागेला सोन्याचा भाव आलेला आहे. पनवेल परिसरात ठिकठिकाणी मोठ्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. अशा परिस्थितीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला पाच विहिरींना जागा मिळाली नाही.
२०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पनवेल तालुक्यात सहा विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तामसई, सारसई, वाजे, बोंडारपाडा, पाली आणि सारसई, (माड भवन) येथे ६७ लाख ३८ हजार रुपये खर्च करून विहिरी बांधण्यात येणार होत्या. त्या मंजूर होऊन ठेकेदारांना काम देण्यात आले. एकूण सहा विहिरींचे ६७ लाख ३८ हजार रुपयांचे काम होते. ते काम सुरू करण्याचा आदेश प्राप्त झाला. मात्र जागेअभावी पाच गावांतील विहिरींचे ५६ लाख रुपये परत गेले आहेत. यातील केवळ पाली येथील विहिरीचे काम पूर्ण झाले आहे
ग्रामपंचायत स्तरावर विहिरीसाठी जागा देणे क्रमप्राप्त होते. विहीर बांधण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला. मात्र, कोणीही जागा देण्यास पुढे आले नाही. जागामालक जास्त पैसे मागत असल्याने ती जागा परवडत नाही. तालुक्यातील पाली गावाजवळ केवळ एक जागा मिळाली. त्या ठिकाणी विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पनवेल परिसरात शासकीय कामांसाठी जागेसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक शासकीय प्रकल्प जागेअभावी परत जात आहेत.