मनपाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने त्रस्त भाजपा नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:17 PM2019-02-11T23:17:25+5:302019-02-11T23:22:22+5:30
भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही ...
भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही नियोजन नसल्याने तेथे पाणी समस्या कायम आहे. त्याचा त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत असल्याने हि समस्या दूर करण्यासाठी नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अखेर भाजप नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी आज महासभेत प्रशासनास जाब विचारीत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे जाहिर करीत त्या महासभेतून उठून गेल्या. परंतू सभागृहातून धावत बाहेर पडल्याने त्यांना चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. या घटनेने महासभेत गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना तात्काळ स्व.इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
शहरातील नारपोली भागात टेकडीवर वसलेल्या साठेनगर येथे सुमारे पन्नास हजार लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर पाणी समस्या आहे. ही समस्या कायमरित्या संपावी या करीता तेथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र त्या टाकीत पाणी कां पोहोचत नाही? याकडे पाणी पुरवठा अधिका-यांचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. टाकीकडे जाणा-या जलवाहिनीतून कोणासही नळ कनेक्शन न दिल्यास टाकीत पाणी साठा होऊन त्याचे लोकवस्तीत वितरण करणे शक्य आहे. परंतू पाणी टाकीत जाण्यापुर्वी लोकांनी जोडणी केल्याने ही समस्या कायम आहे. महानगरपालिकेच्या कामात व पाणीपुरवठ्याच्या कामात हस्तक्षेप करणा-यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. या बाबत भाजपा नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या असून त्यांनी या बाबत निर्वाणीचा इशारा देणारे पत्र ४ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्या पत्रामध्ये समस्या न सोडविल्यास महानगरपालिका मुख्यालयांच्या तीस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा नगरसेविका बगाडे यांनी दिला होता .
आज सोमवार दि ११ रोजी दुपारनंतर महासभा सुरू असताना नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी या विषयावर पुन्हा एकदा आपली पाणी समस्येची व्यथा मांडून झाल्यावर आत्महत्या करण्यासाठी तावातावाने सभागृहाबाहेर जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या.त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. या घटनेनंतर कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक यांनी सभागृहात धाव घेतली. त्यांना उचलून तात्काळ स्व.इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयात येथे उपचाराकरीता दाखल केले . त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. या प्रकाराबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
या बाबत आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या समस्येवर उपाय करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी व विरोधीपक्ष नेता यांच्यात बैठक घडवून तोडगा काढण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने काम सुरू केले असून येत्या दोन दिवसात ते मार्गी लागणार असल्याने साखराबाई बगाडे यांनी असे पाऊल उचलणे गैर असल्याचे सांगितले .