कमी गुणांमुळे ठाण्यातून बेपत्ता झालेल्या दोन मुली रेल्वेमध्ये मिळाल्या
By जितेंद्र कालेकर | Published: September 2, 2018 11:30 PM2018-09-02T23:30:45+5:302018-09-02T23:30:45+5:30
कमी गुण मिळाल्याने पालकांच्या धास्तीने ठाण्यातून दोन मुली घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव (सायन) या रेल्वे स्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा शोध घेतला.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कमी गुणांमुळे मुंबईच्या कुलाबा भागातून पाच मुली बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातूनही दोन मुली याच कारणामुळे घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव या मुंबईतील रेल्वेस्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा शोध घेतला.
प्रमिला सिंग आणि सविता शर्मा (नावे बदलली आहेत. ) या १३ वर्षे वयाच्या दोघीही मुली ठाण्याच्या डोंगरीपाडा येथे वास्तव्याला आहेत. पातलीपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता नववीमध्ये त्या शिकतात. प्रमिला ही अभ्यासात साधारण, तर सविता तिच्यापेक्षा कमी आहे. दोघींनाही अलीकडेच झालेल्या घटकचाचणीत दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाले. त्यामुळे आईवडील रागावतील, या समजातून त्या घाबरल्या. आपण बाहेर जाऊ या, असा प्रस्ताव प्रमिलाने सवितापुढे ठेवला. कुठे जायचे, हे काहीच ठरले नाही. २८ आॅगस्ट रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास दोघीही शाळेच्या कम्पाउंडजवळ गेल्या. शाळेत जाण्याऐवजी त्या हिरानंदानी इस्टेटमार्गे रोडवर आल्या. सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास एका एसटीने त्या ठाणे रेल्वेस्थानकाकडे आल्या. दोघींपैकी एकीकडे २२०, तर दुसरीकडे २५० रुपये होते. त्यांनी तिथे वडापाव खाल्ल्यानंतर ठाणे रेल्वेस्थानकातून रेल्वेने सीएसटी स्थानक गाठले. ती रात्र त्याच स्थानकावर काढली. इकडे दोघींच्याही पालकांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी त्या सायन रेल्वेस्थानकात आल्या. दुपारी एका मित्राला एका दुकानदाराच्या फोनवरून त्यांनी ‘सॉरी’ इतकाच मेसेज टाकला. याच मेसेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले, कैलास टोकले आणि रूपाली रत्ने आदींच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. या दुकानदाराचा शोध घेतल्यानंतर आपण त्यांना ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. परंतु, ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास त्या पुन्हा त्याच दुकानदाराकडे आल्या. पोलिसांचे पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागल्यामुळे त्या घाईतच सीएसटीकडे जाणा-या गाडीत चढल्या. पण, चढताना सविता गाडीतून पडली. त्यावेळी तिला टोकले आणि रत्ने यांनी पकडले. तिच्या वडिलांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. गाडीत चढलेल्या प्रमिलाला मात्र सीएसटी येईपर्यंत झोप लागली. ती पुन्हा त्याच गाडीने डोंबिवलीत गेली. तेव्हा एका महिलेने तिची विचारपूस करून तिच्या आईला फोनवरून ही माहिती दिली. त्यावेळी तिची आई कासारवडवली पोलीस ठाण्यातच होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने डोंबिवली स्थानक गाठून अवघ्या दीड तासात दुसरीलाही ताब्यात घेतले. आपल्या मुली सुखरुप परत मिळाल्यामुळे सामान्य कुटूंबातील या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.