मनसेच्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:59 PM2018-09-05T17:59:29+5:302018-09-05T18:11:41+5:30
अंबरनाथहून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीचे प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही.
अंबरनाथ : अंबरनाथहून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीचे प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. या प्रकरणी मनसेने आज रेल्वे स्थानकात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ज्या प्रमाणात ठेवण्यात आला होता हे पाहिल्यावर अंबरनाथ स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांना लोकलमध्ये चढू न देता हे आंदोलन संपविण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला.
अंबरनाथ स्थानकातून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीतील प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथ स्थानकातील प्रवाशांना बसण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. या प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर शंघटक स्वप्नील बागुल, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देत ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीनंतरही रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाई न केल्याने मनसेने बुधवारी सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढत आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली होती.
मात्र या नोटिसीलाही न जुमानता भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे स्थानकात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या आंदोलनामुळे स्टेशन परिसरात वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षारक्षकांनी संपूर्ण रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त ठेवला होता. मनसे कार्यकर्त्यांकडून काही चुकीचे घडणार नाही यासाठी साध्या वेशात देखील पोलीस तैनात करण्यात आले होते. अंबरनाथ स्थानकात मनसे कार्यकर्ते दाखल होताच त्यांना आवारण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता स्थानकात प्रवेश केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांच्या मागे राहत ते लोकलमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घोषणाबाजी करीत वातावरण तंग केले होते. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे लोकलमध्ये चढण्याची संधीच त्यांना मिळाली नाही. अखेर जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान आजच्या आंदोलनामुळे मनसेचा चांगलाच धडका हा उलट प्रवास करणा-या आणि जागा अडविणा-या प्रवाशांनी घेतला होता. आंदोलनाच्या भितीमुळे एकही प्रवासी उलट दिशने लोकलमध्ये चढला नाही. तसेच प्रत्येक गाडीत पोलीसांचा बंदोबस्त असल्याने आंदोलनांनाही लोकलमध्ये चढता आले नाही.